Categories: Featured

नरेंद्र मोदींच्या सकाळी ९ वाजताच्या भाषणातील महत्त्वाचे ९ मुद्दे, ‘५एप्रिलला ९ वाजता ९ मिनिटं वीज बंद करा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी म्हणजे 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटं घरातील सर्व वीज बंद करण्याचं आवाहन केलंय. त्यांनी देशातील नागरिकांना उद्देशून छोटेखानी भाषणाचा व्हिडीओ प्रसिध्द केलाय. त्यात त्यांनी हे आवाहन केलं आहे.

जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसनं भारतातल्या बहुतांश राज्यात पाय पसरलेत. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सर्व राज्यांच्या सरकारांसह केंद्र सरकारनंही मोठी पावलं उचलली आहे. 24 मार्चपासून 21 दिवसांसाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे.

गुरुवारी ट्वीट करुन नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की, “उद्या सकाळी 9 वाजता देशवासियांना एका व्हीडिओच्या माध्यमातून संदेश देईन.” त्याप्रमाणे, मोदींनी आज सकाळी 9 वाजता पुन्हा एकदा देशवासियांशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे 9 मुद्दे :

  • अंधःकारमय संकटाला पराभूत करण्यासाठी आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवलं पाहिजे – मोदी
  • घंटी वाजवून, थाळ्या वाजवून लोकांनी दाखवून दिलं की, कोरोना व्हायरसविरोधात देश एक होऊन लढू शकतो.
  • आपण लॉकडाऊनदरम्यान घरात नक्कीच आहोत, मात्र आपल्यातला कुणीच एकटा नाहीय. प्रत्येकजण एकमेकांसोबत आहे.
  • कोरोनामुळं निर्माण झालेल्या संकटातून गरिबांना पुढे घेऊन जायचंय, प्रकाशाकडे त्यांना न्यायचंय.
  • येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिलला कोरोनाच्या संकटाला आव्हान द्यायचंय. या 5 एप्रिलला महाशक्तीचं जागरण करायचंय. त्यासाठी रात्री 9 वाजता 9 मिनिट घरातल्या सर्व वीज बंद करा आणि घराच्या दारात किंवा बाल्कनीत उभं राहून मेणबत्ती किंवा मोबाईलची लाईट लावा. आपण एकजुटीनं लढतोय, हे त्यातून दिसेल.
  • आपण एकटे नाही, कुणीच एकटा नाहीय, हा संकल्प आपल्याला करायचाय.
  • कुणीही कुठेही एकत्र जमा व्हायचं नाही. तुमच्या घराच्या बाल्कनीतूनच हे करायचंय.
  • सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मणरेषेला कधीच पार करायचं नाही. कोरोनाला पराभूत करण्याचा हाच रामबाण उपाय आहे.
  • 5 एप्रिलच्या रात्री 9 वाजता भारतमातेची आठवण काढा आणि 130 कोटी जनतेच्या ताकदीचा अनुभव घ्या.

दरम्यान, 24 मार्च रोजी ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून भाषण केलं होतं, त्यावेळी पुढचे 21 दिवस (म्हणजे 14 एप्रिलपर्यंत) देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू, सेवांशिवाय इतर सर्व गोष्टी बंद करण्याचं आवाहान त्यांनी केलं होतं.

Team Lokshahi News