अमरावती। अमरावतीतील चुर्णी गावाच्या दौऱ्यावर असताना अलाहाबाद बँकेच्या शाखेबाहेर लागलेली ग्राहकांची रांग पाहून नवनीत राणांनी चौकशी केली आणि त्यांना ग्राहकांना होणाऱ्या त्रासाविषयी माहिती मिळाली. अलाहाबाद बँकेच्या या अनागोंदी कारभारामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना राग अनावर झाल्याने संतापाच्या भरात त्यांनी अधिकाऱ्यांना ‘बँक फोडून टाकेन’ असा इशारा दिला. त्यांच्या या रूद्रावताराने बॅंक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच पाचावर धारण बसल्याचे पहायला मिळाले.
बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देतात आणि तासनतास रांगेत उभे ठेवतात, अशा प्रकारच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून खासदार नवनीत राणा यांच्याकडे येत होत्या. या तक्रारींबाबत माहिती घेण्यासाठी नवनीत राणा स्वत: मेळघाटमधील चुर्णी गावातील बँकेत पोहचल्या, तेव्हा ग्राहकांनी त्यांना बँकेकडून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली.
चुर्णी गावाच्या दौऱ्यावर असताना अलाहाबाद बँकेच्या शाखेबाहेर लागलेली लोकांची रांग पाहून नवनीत राणा थांबल्या. त्यांनी लोकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी खात्यातील जमा रकमेची माहिती घ्यायची असल्यास बँक कर्मचारी दिरंगाई करतात, बँकेतून एक हजार रुपये काढायचे असल्यास चार दिवस बँकेच्या चकरा माराव्या लागतात, अशी माहिती उपस्थित ग्राहकांनी नवनीत राणा यांना दिली.
नवनीत राणा यांनी यासंदर्भात बँक कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे नवनीत राणा यांना राग अनावर झाला. ‘पाच वाजेपर्यंत मी इथेच थांबते. तोपर्यंत योग्य उत्तर मिळालं नाही, तर बँक फोडून टाकेन, असा दमही त्यांनी दिला. शेवटी पाच वाजता बँकेने लेखी आश्वासन दिल्यानंतर नवनीत राणा तिथून बाहेर पडल्या. त्यांच्या या रूद्रावताराने बॅंक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मात्र पाचावर धारण बसल्याचे पहायला मिळाले.