मुंबई | भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा राजकीय वनवास आता संपण्याची चिन्हे आहेत. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात येणार आहे. एकनाथ खडसे यांच्यासह रामराजे निंबाळकर (Ramraje Nimalkar) यांनाही उमेदवारी देण्यात येणार आहे. रामराजे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील बड्या आणि दिग्गज नेत्यांमध्ये एकनाथ खडसे यांचं नाव घेतलं जातं. एकनाथ खडसे यांनी अनेकवर्ष भाजपसाठी काम केलं. खान्देशात भाजप पक्षाच्या विस्तारात खडसेंचा वाटा महत्त्वाचा मानला जातो. पण भाजपमधील अंतर्गत मतभेदामुळे पुढे खडसे भाजपमधून बाहेर पडले. एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील नाराजी अनेकदा व्यक्त केली. पण त्यांच्या नाराजीची दखल भाजपच्या हायकमांडकडून फारशी घेतली गेली नाही. त्यामुळे खडसेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

खडसे त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून दोन दशक आमदार म्हणून निवडून आले. त्यांना भाजप सरकारच्या काळात मंत्रीपदही मिळालं. ते राज्याचे महसूल मंत्री होते. पण मंत्री असताना त्यांनी अवैधपणे जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला उतार लागला. तरीही खडसे आलेल्या परिस्थितीला तोंड देत राहिले. त्यांना 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसेंचं पूनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरु होता. त्यासाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत खडसेचं नाव पाठवण्यात आलं होतं. पण राज्यपालांनी दोन-अडीच वर्षानंतरही आमदारांची निवड केली नाही. अखेर एकनाथ खडसेंचा राजकीय वनवास थांबवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेत ते निवडून आले तर कदाचित त्यांना मंत्रिमपदाची देखील संधी मिळू शकते. पण आताच त्याचा अंदाज बांधणं कठीण आहे.

विधान परिषदेसाठी शिवसेनेचा मोठा निर्णय

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवसेने देखील महत्त्वाचे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून दोन नव्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. त्याचा परिणाम म्हणजे शिवसेनेतील एका बड्या मंत्र्याला आपलं कॅबिनेट मंत्रिपद सोडावं लागणार आहे. शिवसेनेनं विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीतून जेष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना वगळलं असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई हे राज्याचे उद्योगमंत्रीही आहेत. त्यामुळे सुभाष देसाई यांना विधानपरिषदेवर पुन्हा संधी न मिळाल्यास आणि आमदार नसल्याने ते पुढील जास्तित जास्त 6 महिने मंत्रिपदावर राहू शकतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की पुढील काही महिन्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार हे नक्की आहे.