कोल्हापूर। कोल्हापुरात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला, असून कोरोनाग्रस्तांची संख्या ३ वर गेली आहे. कसबा बावडा येथील ६३ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकही नवीन रूग्ण आढळला नव्हता, मात्र आज नवा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या ६३ वर्षीय महिलेचा कोरोनाबाबतचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. कसबा बावडा येथील मराठा कॉलनीत राहणारी ही महिला २० व २१ मार्च रोजी सातारा येथे गेली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २२ ते २८ मार्च ती कोरेगाव तालुक्यातील बनवडे येथे गेली होती. २८ मार्च रोजी ती कोल्हापूरमध्ये परत आली होती. तिला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे ३० मार्चला दिसून आली. दुसऱ्याच दिवशी ३१ मार्चला खासगी रुग्णालयात तिने उपचार घेतला. ३ एप्रिल रोजी बावड्यातील सेवा रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीपीआरमध्ये दाखल करुन तिचा स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.
यादरम्यान तिच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्याबाबत पुढील खबरदारीचे उपाय म्हणून कार्यवाही सुरु आहे. तिच्या घरच्यांचे स्वॅब देखील मिरजेला पाठवण्यात आले आहेत. गेले काही दिवस नवीन रूग्ण न आढळल्याने कोल्हापूरकराना दिलासा मिळाला होता, परंतु पुन्हा नवीन रूग्णाची भर पडल्याने भिती निर्माण झालीय.