कोल्हापूर जिल्हा परिषदेत लवकरच खांदेपालट – मुश्रीफांनी दिले संकेत

कोल्हापूर | मागील वर्षी जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता उलथवून महाविकास आघाडीने सत्तांतर घडवून आणले होते. या सत्तांतरानंतर ठरलेल्या फॉर्मुल्यानुसार खांदेपालट करण्याचे संकेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत. यामुळे इच्छूकांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला असून नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. 

मागील डिसेंबर महिन्यात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार पी.एन.पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील या सर्वांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यावेळी पदाधिकारी निवडताना नेत्यांना मोठी कसरत करावी लागली होती. अनेकांचे रूसवे फुगवे काढावे लागले होते, तीच परिस्थिती यावेळी देखील निर्माण होणार असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुन्हा कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. 

विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल ठरलेल्या फॉर्मुल्यानुसार या डिसेंबर महिन्यात संपत असून येत्या आठवड्यापासून नवीन पदाधिकारी निवडीच्या हालचाली गतीमान होणार आहेत. जिल्हा परिषदेचा कार्यकाल आणखी वर्षभराचा असून या दरम्यान कुणाची वर्णी लावायची यासाठी नेत्यांचा कस लागणार आहे.

सध्या कॉंग्रेसकडे अध्यक्ष पद तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष पद आहे. तीन सभापती पदे शिवसेनेकडे तर एक सभापती पद स्वाभिमानीकडे आहे. आता यापैकी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची कॉंग्रेस राष्ट्रवादीत अदलाबदल होईल. चार सभापती पदांपैकी २ सेनेकडे तर उर्वरित २ पैकी १ स्वाभिमानीकडे  आणि १ चंदगड विकास आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे.