Categories: राजकीय

अन्याय एवढाच करा जेवढा तुम्हाला सहन होईल : शौमिका महाडिक

कोल्हापूर। हातकणंगले तालुक्‍यात 11 सदस्य असताना केवळ महाडिक यांच्याच निधीला कात्री लावली आहे. तसेच नागरी सुविधा, जनसुविधा, क वर्ग पर्यटनस्थळ यामध्येही असाच अन्याय केला आहे. पालकमंत्री व अध्यक्षांकडून व्यक्‍तीद्वेषातून निधी कपात केला जात असल्याचा आरोप, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केला. तसेच अन्याय एवढाच करा जेवढा तुम्हाला सहन होईल, असा इशाराही त्यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हा नियोजन मंडळाने नागरीसुविधा, जनसुविधा, क वर्ग यात्रास्थळ आदी वर्गवारीतील कामांना मंजुरी दिली आहे. अनेक गावातील कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून काही गावांना तर कामाचे आदेश दिले आहेत.
कामाची लोकवर्गणी देखील भरण्यात आली आहे. असे असताना, अचानक ही कामे रदद करणे, अंशत: बदल करणे हा प्रकार कशासाठी? या रदद केलेल्या कामांची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी केला. जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी प्रश्‍नांची उत्तरे न देता ही सभा गुंडाळली आहे. अध्यक्षांनी तर सर्वच विभागांना पत्र देवून कामे थांबवण्याचे आदेश दिले आहेत. ही कामे थांबवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला, असा सवालही त्यांनी केला.
 
विविध विकास कामांच्या फाईल तटवून जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील व बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील हे 1 टक्‍के दराने पैसे गोळा करत आहेत. माझ्या मतदारसंघातील दीड कोटी रुपयांच्या कामाच्या चार फाईल यासाठीच तटवल्या असल्याचा आरोप, माजी बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी केला. 3054, 5054 या हेडखालील ही कामे आहेत. मार्च अखेर आल्याने या कामांची निविदा प्रक्रिया राबवून, ही कामे पूर्ण करणे आवश्‍यक आहे. मात्र जाणीवपूर्वक ही कामे थांबवली असल्याचे पेरीडकर यांनी सांगितले.

Lokshahi News