Categories: राजकीय

नितीशकुमारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा ज्युनियर पवारांकडून खरपूस समाचार

‘त्या-त्या राज्यात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या भूमिपुत्रांना मिळाल्या पाहिजेत, पण नोकऱ्या निर्माण करण्याची ताकद त्या राज्यातील नेत्यांमध्ये पाहिजे. महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये अशी ताकद दिसते, ती बिहारसारख्या नेत्यांमध्ये का नाही? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नितीशकुमार सरकारला टोला लगावला आहे.

देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटकाळात खबरदारीचा उपाय म्हणून देशात लागू केलेला लॉकडाऊन आता उठवण्यात आला आहे. या काळात स्वगृही गेलेल्या बिहारच्या स्थलांतरित कामगारांनी पुन्हा महाराष्ट्राची वाट धरली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी नितीश सरकार सोबतच राज्यातील भाजपावर निशाणा साधला आहे.

त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये बिहारच्या बंद पडलेला साखर कारखाना, लघु उद्योग, बंद पडलेल्या सरकारी रुग्णालयाचे फोटो शेअर करत, बिहारमध्ये विकास कामधंदा उद्योगधंदे नाहीत, म्हणून तेथील भूमिपुत्रांना महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात जाण्याची वेळ आल्याचे म्हंटले आहे. तसेच कोविड-१९ च्या काळात बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी ‘आधीच्या सरकारने केले नाही म्हणून आमच्याकडं हॉस्पिटल नाहीत’, या केलेल्या वक्तव्याचा आधार घेत, सत्ताधारी मंत्री असं बोलतोय हाच एक मोठा विनोद आहे आणि अशा राजकीय वक्तव्यातूनच त्यांची विकासाची ‘दृष्टी’ दिसून येत असल्याचा टोला ही ज्युनियर पवारांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे.

Team Lokshahi News