Categories: Featured मनोरंजन

‘चला हवा येऊ द्या’ मधून महापुरूषांचा अवमान करणाऱ्या निलेश साबळेने ‘अशी’ मागितली जाहीर माफी

मुंबई। ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेचा सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे यांनी चला ‘हवा येऊ द्या’मध्ये वापरलेल्या वादग्रस्त फोटोबद्दल जाहीर माफी मागितली आहे. राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी निलेश साबळे यांच्यावर राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीचा वापर केल्याचा आरोप केला होता. तसेच याबद्दल जाहीर माफी मागण्यास सांगितलं होतं. यानंतर निलेश साबळेने एक व्हिडीओ शेअर करत झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. महापुरूषांचा अपमान केल्याने निलेश साबळे, भाऊ कदम, कुशाल बद्रिके तसेच झी वाहीनीवर टीकेची झोड उठली होती.

आपल्या माफीनाम्यात निलेश साबळेने, “कालपासून एक फोटो फिरतो आहे. तो ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये दाखवलेला असल्यानं बरेचसे गैरसमज निर्माण झाले आहेत. खरंतर ते स्किट आणि प्रहसन वेगळं होतं. त्यामध्ये तो फोटो वेगळ्या कारणाने, वेगळ्या अर्थाने वापरला होता. त्यामध्ये कोणत्याही महापुरुषांचा, महान पुरुषांचा अपमान करण्याचा आमचा उद्देश नव्हता. तो पूर्वीही नव्हता, यापुढेही कधीच नसेल. पण त्यामुळे वाद निर्माण झाला. गैरसमज निर्माण झाले. त्यामुळेच मी तुमच्यासमोर आलो आहे.” असे म्हणटले आहे.

खरंतर छत्रपती शाहू महाराज किंवा या देशातील सर्वच महान व्यक्ती यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्यामध्ये वापरलेला फोटो शाहूमहाराजांचा नव्हता. पण ज्याही राजांचा होता त्यांच्याबद्दलही आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. सर्वच महापुरुषांबद्दल आम्हाला नितांत आद रआहे. अगदीच तांत्रिक गोष्टीतून झालेली ती चूक होती. त्यामुळे याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो, मी माफी मागतो. क्षमस्व

दरम्यान, संभाजीराजेंनी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीचा वापर केल्याचा आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी त्यांनी, ‘लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे.’ असे म्हणटले होते. निलेश साबळे तसेच झी वाहिनीने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी आणि दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशाराही छत्रपती संभाजीराजे यांनी दिला होता. 

Team Lokshahi News