Categories: राजकीय सामाजिक

राणे बंधूंचा कोकणी चाकरमान्यांसाठी ठाकरे सरकारवर प्रहार; म्हणाले…

मुंबई | कोरोनामुळे यंदाचे सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. येत्या काळात देखील असेच सुरू राहणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने गणेश चतुर्थीला कोकणात जाणाऱ्या जनतेसाठी गाड्यांची सोय केली नसल्याचे सांगत भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. “प्रशासन ठप्प, पालकमंत्री गायब… याला म्हणतात ठाकरे सरकार”, अशा शब्दात नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर प्रहार केला आहे.

तर भाजप नेते निलेश राणे यांनी देखील याच विषयावरून ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहेत. “कोकणात जाण्यासाठी लोकांना खूप त्रास होतोय. राज्य सरकारने ई-pass चे नाटक बंद करावं, काही गरज नाही पासची. दलालांना पोसण्यासाठी पास ठेवलाय काय? क्वाॅरंटाईन किती दिवसाचा असेल हे पण सरकारने अजून सांगितले नाही. कोकणी माणूस मागच्या ४ महिन्यांपासून जे भोगतोय ते कधी विसरणार नाही”, अशा खोचक शब्दात निलेश राणे यांनी टीका केली आहे.

ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून राणे बंधू अधिक आक्रमक झाले असून सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचेच आत्तापर्यंत तरी दिसत आहे. त्यामुळे राणे बंधूंनी ठाकरे सरकारवर केलेल्या या टिकेला काय उत्तर मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Team Lokshahi News