सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनासाठी घेतले जाणारे स्वॅब नमुने तपासणीसाठी कोल्हापूरच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोग सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठवण्यात येत आहेत. परंतु याठिकाणावरून प्राप्त होत असलेल्या अहवालांसदर्भात आमदार नितेश राणे यांनी शंका उपस्थित केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले असून राज्य सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित केली आहे. नितेश राणेंनी आपल्या ट्विट मध्ये एका महिलेचा रिपोर्ट जोडला असून, या सरकार वर कोण विश्वास ठेवणार ?? एक महिलेचा रिपोर्ट पहिला Positve आणि मग १ तासात Negative होतो? सिंधुदुर्गात होतो हा चमत्कार!!! असे म्हणटले आहे.
सध्या राज्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनाची मोठी दमछाक होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मुंबईवरून आलेल्या चाकरमान्यांच्या रूपाने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. आत्तापर्यंत सिंधुदुर्गात कोरोनाचे ८ रूग्ण असून यापैकी ४ अॅक्टिव्ह असल्याची माहिती आहे. सिंधुदुर्गातील कोरोनाबाधितांचा आकडा आणि मुंबईवरून आलेल्या चाकरमान्यांची संख्या पाहता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या नगण्य आहे. परंतु हेच याबाबतीत शंका निर्माण करणारं असून जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून केवळ राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे.
आमदार राणे यांनी केलेल्या या ट्विटवरून प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आला नसून प्राप्त रिपोर्टच्या बाबतीत सध्यातरी संभ्रमाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून कोणताच खुलासा येत नसल्याने कोल्हापूर येथील नमुने तपासणीच्या आरोग्य यंत्रणेच्या सदोष कामकाजाची चर्चा होऊ लागली आहे. अशा पध्दतीने यंत्रणांकडून चुकीचे अहवाल प्राप्त होत असतील तर ती मोठी चिंतेची बाब असल्याचे जिल्ह्यातील नागरिकांचे म्हणणे आहे.