शेतीमध्ये दिवसेंदिवस यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे. महिंद्रा कंपनीने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने बटाट्याची लागवड जलद गतीने व्हावी यासाठी एक नवी मशीन बनवली असून बुधवारी महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीने लॉन्च केली आहे. या मशीनचे नाव प्लांटिंग मास्टर पोटॅटो असे ठेवण्यात आले आहे. कंपनीने हे कृषी यंत्र युरोपस्थित कंपनी डेवुल्फ सोबत मिळून तयार केले आहे. हे मशीन भारतीय शेतीच्या परिस्थितीनुसार बनविण्यात आले असून ते अधिक उत्पन्न आणि उच्च गुणवत्तेसाठी मदत करत असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
महिंद्रा आणि डेवुल्फने मागील वर्षी पंजाबमधील प्रगतीशील शेतकऱ्यांसोबत मिळून बटाटे लागवडीच्या या तंत्रावर काम केले होते. तेव्हा बटाटे उत्पन्नात २० ते २५ टक्क्यापर्यंत वाढ नोंदविण्यात आली होती. दरम्यान बटाटे लागवड करण्याची मशीन ही भाडे तत्वावरही उपलब्ध आहे. या मशीनला खरेदीसाठी एक सहज सोप्या पद्धतीने वित्तपुरवठा केला जाणार आहे. प्लांटिग मास्टर मशीन विक्रीसाठी पंजाबमध्ये उपलब्ध आहे. तर उत्तर प्रदेशात विक्री आणि भाडोत्री पद्धतीवरही उपलब्ध असेल. गुजरातमध्येही ही मशीन भाडोत्री पद्धतीवर उपलब्ध आहे.