Categories: आरोग्य सामाजिक

आता घरीच कोरोना रूग्णांवर उपचार, ‘या’ आहेत अटी!

कोल्हापूर | जिल्ह्यात प्रदीर्घ अशा लॉकडाऊन नंतर ही कोरोनाचे थैमान चालूच आहे. उलटपक्षी दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. पालिकेच्या रूग्णालयात पाय ठेवायलाही आता जागा नाहीये. आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. हा ताण कमी करण्यासाठी ज्या रूग्णांना अतिसौम्य किंवा लक्षणेच नसतील अशा रूग्णांवर घरीच उपचार करण्यात येणार आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी परिपत्रक जारी केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या  नव्या नियमानुसार सौम्य, अति सौम्य, मध्यम तीव्र व तीव्र लक्षणे असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यातील अती सौम्य किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना रूग्णांना घरीच विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 

अशा आहेत सुचना

  • नोडल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्ण पॉझीटिव्ह आल्यानंतर तपासून तो अति सौम्य व लक्षणे नसलेला आहे हे प्रमाणित करावे. वयोवृध्द रूग्ण (६० वर्षापेक्षा जास्त वय असलेले) इतर आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, जुनाट यकृत, फुप्फूस, मूत्रपिंडाच्या रूग्णांच्या वैद्यकीय तपासणीनंतर परवानगी द्यावी.
  • ग्रामसमितीने घरात स्वतंत्र व्यवस्था असल्याची खात्री करावी.
  • प्रोटोकॉल प्रमाणे औषध गोळ्या रूग्णांच्या जबाबदार नातेवाईकांच्या ताब्यात देऊन आरोग्‍य शिक्षण देवून घरी पाठवावे.
  • रूग्णाच्या नातेवाईकाकडे नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील काळजी केंद्राचा संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय अधिकारी यांनी स्वतंत्र नोंद वही ठेवून आवश्यक त्या वेळी तातडीने गंभीरता ओळखून रूग्ण सेवा द्यावी.
  • दिवसातून दोनवेळा दूरध्वनीव्दारे रूग्णाची माहिती घ्यावी. गृह भेट देणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्याकडून पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करून आरोग्य शिक्षण द्यावे.
  • वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती व सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची मात्रा घ्यावी.

जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात, रूग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीं आणि रूग्णांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच  गृहविलगीकरणासाठी असलेले अपात्रतेच्या निकषांसोबतच वैद्यकीय मदतीचा कालावधी, गृहविलगीकरणाचा कालावधी याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. हे परिपत्रक जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना पाठविण्यात आले आहे.

Team Lokshahi News