Categories: ब्लॉग

निर्यातबंदीत कांदा अन् देशभक्तीचा वांदा..!

स्थळ : शहाणेवाडीचा पार
प्रसंग : नेहमीप्रमाणे शहाणेवाडीतील वयोवृद्ध मंडळी पारावर चकाट्या पिटायला जमा झालेली असतात. इतक्यात दिनाआप्पा हातात कांद्याची पिशवी घेऊन येत असतात.

संभाण्णा : काय दिनाबा? काय आणलंस पिशवीतनं इदुळा?
दिनाप्पा : कांद्याचा दर पडला म्हणून बातम्या दाखवत व्हते टिवीवर लागलीच 7 किलू घिवून आलो. 
किशादा : (मध्येच तोडत) हे बरं केलस गड्या, पर अचानक कांदा कसा सस्त झाला म्हणायचा? 
दिनाप्पा : केंद्र सरकारान काल निर्यातीवर अचानक बंदी घातली आन् हिकडं कांदा सस्त झाला, पार दर पडला बगा.
किशादा : मायला ह्या केंद्र सरकारच्या… लगांनो, 2014 च्या विधानसभा परचाराच्या येळला नाशिकच्या सभंत मुदीसायब म्हणल्याला, युपीए सरकारनं 4 यळला कांद्यावर निर्यातबंदी लादली पर आमी तसं करणार नाय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्युक्लीअर सायन्सची मदत घीवून आधुनिक तंत्रज्ञानाने कांदा उत्पादनाला मदत करणार.
संभाण्णा : काय मर्दा? मुदीन सांगिटलेल्यावर इस्वास ठिवलासा व्हयं? मग घ्या झाली शेती… ह्या दिनाला घ्या बेशरमाची बागायती पिकवा… लावलं क्याळ आणि रताळं.
ख्या ख्या ख्या (पारावर हशा पिकतो)
किशादा : संभाण्णा बरुबर हाय तुझं, नाशिकच्या शेतकरी संजय साठेंना कांदा इकल्यावर प्रतिकिलो 1 रुपया 40 पैसे दर लागला हुता. त्येज मिळालेले 1 हजार 64 रुपयांची मनीऑर्डर पंतपरधानाला केलती. 2019 च्या लोकसभच्या प्रचाराला आल्यावर भेट मागिटली व्हती पर कारस्थानी फडणवीस आणि लबाड मुदीन त्येला भेट दिली न्हाय.
दिनाआप्पा : हात्त तेज्यायला, जरा काय झालं की आणल का मुदीसायबाला मधी… ही ही ही
संभाण्णा : लगा, पाकिस्तानचा कांदा आयात कोण करत व्हतं? मुदी सायेब आन् फडणवीसच नौका?
दिनाप्पा : व्हय की?
किशादा : (मध्येच तोडत) आन् निर्यातीवर बंदी कोण घालतं? ज्यामुळं हितलं दर पडत्यात.
दिनाआप्पा : मुदीसायब, मजी केंद्र सरकारच की!
संभाण्णा : मग जबाबदार तेनास्नीच धरणार की, का धरतोस आमच्या ‘बा’ ला! ख्या ख्या ख्या
किशादा : तसंबी मागंच आर्थमंत्रीण बाईंनी सांगिटल व्हतं, ‘मी कांदा लसूण खात न्हाई मला कांद्याचं इच्चारु नगा’… ही ही ही
दिनाप्पा : पर मुदी सायबानी कायतरी इचार करुनच निर्यातीवर बंदी घाटली आसल की…
किशादा : आर बाबा दिना, कसा रं तु इतका भोळा? लगा काल संसदेत इचारणा झाली लॉकडाऊन झाल्यावर पायपीट करत गेलेल्या किती प्रवासी मजुरांचं मृत्यु झालं? तर सरकार म्हणतंय आमच्याकडे आकडा न्हाय…
संभाण्णा : लगा सगळ्या जगानं, वाटवर माणस मरताना बघिटली, बाया बाळत झाल्याल्या बघिटल्या, घराजवळ गेल्याली पोरंबाळं तडफाडून मेल्याली बघिटली आनं सरकारकडं म्हायती न्हाय? आरं माज्या कर्मा कुठं फेडतील ह्या लबाड्या…
किशादा : खरंय मर्दा इतकी माणसं मेली तेज काय न्हाय आणि आजून काय कांदा पिकिवणाऱ्या शेतकऱ्यांनी फास लावून घेटला म्हणून काय मुदी सायबाला सुताक येणार हाय व्हय?
दिनाप्पा : तस न्हवं, पर देशातबी कांदा इकत घेणाऱ्या मानसांस्नी परवडला पायजेल की… त्येचा इचार बी झालाच पायजेल की.
संभाण्णा : आर बाबा, आत्तापातुर देशात ढिगभर उत्पन्न होत हुत तवा पाकिस्तानचा कांदा आमच्या बोकांडी आणला आन् आता कांदा उत्पन्न कमी झालं तर निर्यात बंद केली. गेलं साली 44 कोटींची निर्यात केलती यंदा नुसती 19.8 कोटी केलीय. मग देशाला परकीय चलन कसं मिळणार? आत्मनिब्बर कसं हुणार?
दिनाप्पा : आता देशात करुना आला त्येला काय सरकार जबाबदार हाय वी?
किशादा : लगा दिना, केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय 2019 मधी घेतला त्येनबी कांदा उत्पादक आडचणीत आलाच की त्येलाबी करुना जबाबदार हाय का देवाची करणी?
संभाण्णा : आरं काय नाय बग, शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला दर मिळू लागला म्हणून बघ या गुजरगांड्यांचं पित्त खवाळलंय. केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठलाय, आता रस्त्यावर उतरुन रुमणं हातात घेतलं पायजेल तवा मुदी मुदी करणारी टाळकी ताळ्यावर येतील. 
दिनाप्पा : बरं मी चलतो, घरात कोरड्यास करायची थांबली आसत्याल…
दिनाप्पाने काढता पाय घेतलेला बघून पारावर एकच हशा पिकतो…

– तुषार गायकवाड (लेखक राजकीय विश्लेषक असून वरील उपहासात्मक लेखन हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)

Tushar Gaikwad

Share
Published by
Tushar Gaikwad
Tags: onion export onion export by central government