नाशिक। गेले अनेक दिवस शंभरी पार केलेल्या कांद्याचे भाव दिवसेंदिवस गडगडू लागलेत. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून देखील सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी आता डीजीटल माध्यमाचा प्रभावी वापर करण्याचे निश्चित केले असून ट्विटरच्या माध्यमातून आवाज उठवण्याची मोहिम आखली आहे. ट्विटरच्या माध्यमातून कांदा उत्पादकांचे गाऱ्हाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने “ट्विटर मिशन’ सुरू केले आहे. ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करून निर्यातबंदी उठवण्याची मागणी रेटण्यात येत आहे.
महाराष्ट्रात उत्पादित होणारा कांदा देशभराच्या बाजारपेठेसह परदेशी बाजारपेठेतही प्रसिध्द आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. हे शेतकरी आपल्या ट्विटच्या माध्यमातून शेतकरी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना निर्यातबंदी उठवण्याची विनंती करतील, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे.
जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे म्हणाले, की राज्यातील शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोचवण्यासाठी ट्विटरच्या माध्यमातून सक्रिय व्हावे, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. त्याचा वापर ते प्रभावीपणे करत आहेत. आतापर्यंत केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवावी, या मागणीसाठी संघटनेने अनेक आंदोलने केली. त्याचा पुढील टप्पा म्हणून ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सरकारपर्यंत पोहचावे, यासाठीचा हा प्रयत्न आहे.
• “महाराष्ट्राचा कांदा उत्पादक ऑन ट्विटर हे मिशन राबविण्यात येईल. त्यामध्ये कांदा उत्पादकांनी मोठ्या संख्येने सहभागी होणे अपेक्षित आहे. ट्विटर नेमके कसे वापरायचे, याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पोचवण्यात येत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी ट्विटर अकाउंट सुरू करायचे आहे. – भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना