Categories: कृषी

कांदा निर्यातबंदी पाकिस्तानच्या पथ्यावर; भारतीय शेतकऱ्यांचं मात्र मोडणार कंबरड..!

नवी दिल्ली | देशातील कांद्याच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकारने सोमवारी कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून अमर्याद कालावधीसाठी बंदीचा आदेश जारी केला आहे. निर्यात बंदीच्या या आदेशामुळे कांद्याच्या दरात लगेचच ४०० ते ५०० रुपयांनी घसरण झाली आहे.

देशांतर्गत बाजारात कांद्याची कमतरता आहे. कांद्याची उपलब्धता वाढावी या हेतूने निर्यात बंदीचे आदेश केंद्र सरकारने दिलेत. तेलंगण, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पावसामुळे ४०% कांदा खराब झाला. परिणामी महाराष्ट्रातील, विशेषत: नाशिक जिल्ह्यातील उन्हाळी कांद्याला मागणी वाढल्याने गत आठवड्यापासून दरात तेजी आली आहे. त्यामुळे बाजारपेठांना कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निर्यात बंदी लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून येणारा दर्जेदार कांदा भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे.

निर्यातबंदीचा पाकिस्तानला फायदा –
कांद्याची सर्वाधिक निर्यात भारतातून बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका येथे केली जाते. शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असतानाच केंद्राने निर्यातबंदी करून अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप केल्याने उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र अन्याय होणार असल्याची प्रतिक्रिया काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. तर कांदा निर्यातबंदी झाल्याने पाकिस्तानातील निर्यातदार भारतीय निर्यातदारांच्या ग्राहकांशी संपर्क साधून भारतापेक्षा कमी दराने कांदा विकून संधीचा फायदा घेण्याची शक्यता ही समोर आली आहे.

Team Lokshahi News