कांद्याच्या २०२० या नव्या मार्केटिंग वर्षात उत्पादन व पुरवठावाढीच्या दृष्टचक्राचे संकेत

onion

पुणे।१ ऑक्टोबर।दीपक चव्हाण)। कांद्याचे आज पासून नवे मार्केटिंग वर्ष सुरू होत आहे. ऑक्टोबर ते सप्टेंबर हे कांद्याचे मार्केटींग वर्ष गणले जाते. सर्वसाधारण लागणी जूनपासून सुरू होतात. म्हणून जुलै ते जून हे पीक वर्ष होय, तर सर्वसाधारण मुख्य खरीप आवक ऑक्टोबरपासून सुरू होते. त्या दृष्टिने ऑक्टोबर-सप्टेंबर हे मार्केटिंग वर्ष होय. मुख्य खरीप आवक ऑक्टोबरपासून सुरू होते. पुढे लेट खरीप, रब्बीचा माल टप्प्याटप्प्याने येतो. ऑक्टोबर ते सप्टेंबर २०१९-२० मध्ये पुरवठ्याचे चित्र, बाजारभावाची दिशा काय राहील याची मांडणी करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यातील हा पहिला लेख.

सप्टेंबर अखेरचा कॅरिफॉरवर्ड झालेला जूना (रब्बी) शिल्लक साठा, आणि खरीपाची संभाव्य आवक मिळून ऑक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या तिमाहीचे एक चित्र मिळते. पुढे जानेवारी ते मार्च या दुसऱ्या तिमाहीत लेट खरीप मालाचा पुरवठा होतो, तर एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत टिकवण क्षमता असणारा उन्हाळ (रब्बी) कांदा बाजारात असतो. संबधित तिन्ही हंगाम मिळून अनुमानित एकूण पुरवठा, त्यातुलनेत देशांतर्गत व निर्याती मागणी असे मिळून मागणी – पुरवठा व शिल्लक साठ्याचे एक बॅलन्सशीट तयार होते. त्यावरून बाजाराचा कल समजण्यास मदत होते.

  • नव्या मार्केटिंग वर्षांतील वर्तमान तिमाहीत उत्पादन व पुरवठ्याचा कल काय आहे, या दृष्टिने काही नोंदी.

१. ऑक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या तिमाहीत कॅरिओव्हरचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. ऑक्टोबरमध्ये १० ते १२ लाख टन शिल्लक कॅरिफॉरवर्ड झाल्याचे खासगी अनुमान आहे. संपूर्ण देशाची दहा दिवसांची गरज भागवेल एवढा स्टॉक नाशिक, नगर, पुणे आणि मध्यप्रदेशात शिल्लक असणे शक्य आहे. दुसरीकडे, जुलै-ऑगस्टमधील खरीप लागणींचा पुरवठा हा चालू ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतील मागणीच्या प्रमाणात कमी राहिल. कारण, जुलै-ऑगस्ट या दोन महिन्यातील देशाचे सर्वसाधारण खरीप क्षेत्र १.८ लाख हेक्टर असून, त्यात किमान ३० टक्क्यांची घट असू शकते. महाराष्ट्राचे उदाहरण बोलके आहे, खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार हेक्टर असून, त्यातुलनेत ऑगस्टअखेर ४२ हजार हेक्टरवर लागणी झाल्याच्या नोंदी आहेत. म्हणजेच तीस टक्के घट दिसतेय. महाराष्ट्रातील मालाची नोव्हेंबरपासून आवक सुरू होईल. देशभरातील लागणींचे आकडे उपलब्ध नसले तरी सर्वसाधारण वरीलप्रमाणेच ट्रेंड शक्य दिसतोय. आंध्र-कर्नाटकात जुलैच्या लागणींचा माल ऑक्टोबरमध्ये येतो. वरील परिस्थिती दोन्ही राज्यांना लागू पडते. यात दुसरा मुद्दा असा की, जुलै-ऑगस्टच्या लागणी सप्टेंबरमधील पावसाच्या तडाख्यात सापडल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. उदा. मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पाच हजार हेक्टर क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र बाधित झाल्याचे वृत्त आहे.

२. दुसरी तिमाही म्हणजे जानेवारी ते मार्चमध्ये पुरवठा सुरळीत होईल असे दिसते. सुरळीत या अर्थाने की मागणी पुरवठ्यात सध्या जेवढा गॅप आहे, तेवढा दुसऱ्या तिमाहीत नसणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमधील लागणींचा माल प्रामुख्याने दुसऱ्या तिमाहीत असेल. सप्टेंबरमध्ये बाजार उंच असल्याने लागणीत विक्रमी वाढ दिसतेय. त्याचे पहिले कन्फर्मेशन शेखावटी या राज्यस्थानमधील पारंपरिक कांदा उत्पादक विभागात मिळाले आहे. येथील लागणी १५ हजार हेक्टरवरून २५ हजार हेक्टरपर्यंत वाढ शकतील, असे स्थानिक कृषी विभागाने म्हटले आहे.

३. तिसरी तिमाही म्हणजे एप्रिल ते जून आणि चौथी तिमाही जून ते सप्टेंबर (२०२०) या एकूण सहामाहीत उच्चांकी पुरवठा असेल. त्याचे कारण आजच्या उंच बाजारभावामुळे शेतकऱ्यांमध्ये उन्हाळ लागणींबाबत असलेला उत्साह होय. शिवाय, चांगल्या पावसाळ्यामुळे पाण्याची वाढ कांदा बियाण्याचे उंचावत जाणारे भाव हे त्याचेच निदर्शक आहे. शिवाय, पावसामुळे सप्टेंबरमध्ये रोपे खराब झाल्याने ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक रोपवाटिका तयार होतील. तसेच थेट बी फोकणी (पेरा) ट्रेंडही आता महाराष्ट्रात रूजत आहे.

४. नव्या मार्केटिंग वर्षात संपूर्ण निर्यातबंदी ही अडचणीची बाब आहे. जेव्हा बाजारभाव सामान्य पातळीत म्हणजेच प्रतिक्विंटल हजार ते पंधराशे दरम्यान असतात, त्यावेळी एकूण देशांतर्गत खपाच्या किमान नऊ- दहा टक्के इतके निर्यातीचे प्रमाण असते. याबाबत अगदी अलिकडचे उदाहरण २०२८-१९ जुलै-जून पीक वर्षांत २.३ कोटी टन उत्पादन होते. त्यातुलनेत एप्रिल ते मार्च २०१८-१९ या कालावधीतील निर्यातीचा आकडा हा २१.८ लाख टन होता. निर्यात कालावधीच्या महिन्यांतील दर हे सर्वसाधारपणे एक हजार रुपये किंवा त्या खाली होते. सामान्य परिस्थितीत एकूण उत्पादनाशी निर्यातीचे प्रमाण ९ टक्के दिसते. यावरून निर्यात सुरू राहणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल.

५. निर्यात सुरळीत होण्यासाठी राजकीय पातळीवर पाठपुरावा आणि खासकरून नोव्हेंबरपासूनच्या लागणींचे क्षेत्र मर्यादित ठेवणे या बाबी २०२० मधील जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीतील पुरवठावाढ रोखण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील. देशातील एकूण पुरवठ्यात महाराष्ट्राचा वाटा ३५ ते ४० टक्क्यांदरम्यान रहात असल्याने सर्वाधिक नफा वा तोटा येथील शेतकऱ्यांना होणे क्रमप्राप्त ठरते. ( क्रमश:)

(माहिती स्त्रोत – डीजीएफटी, केंद्रीय कृषी मंत्रालय, कृषी खाते महाराष्ट्र, राजस्थान व मध्यप्रदेशातील स्थानिक वृत्तपत्रे)

  • नम्र निवेदन

सर्वप्रथम हे नमूद करतो, की उपरोक्त लिखाणासाठीचे सोर्स आणि साधनांची उपलब्धता अतिशय मर्यादित आहे. महाराष्ट्राचा अपवाद वगळता राज्यवार कांदा लागणीची माहिती उपलब्ध नसणे, स्टॉक आकडेवारीचा अभाव आणि दुष्काळ-अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, प्रतिएकरी उत्पादकता मोजण्याच्या शास्त्रीय व व्यावसायिक पद्धती उपलब्ध नसतात. म्हणून, आहे त्या उपलब्ध माहितीच्या आधारे बाजाराचा कल स्पष्ट करण्याचा प्रयत्न असतो. शेतकऱ्यांमध्ये बाजारभावविषयक साक्षरता तयार होणे आणि त्यानुसार लागणींबाबत योग्य निर्णय़ व्हावेत, हा लिखाणामागील उद्देश आहे.

  • दीपक चव्हाण, पुणे (शेती अभ्यासक)