Categories: कला/संस्कृती

महिला आर्थिक विकास महामंडळाकडून ऑनलाईन सामाजिक उखाणे स्‍पर्धा, ‘या’ ठिकाणी करा संपर्क

मुंबई | उखाणा घेणे हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे. याच गोष्टीला नजरेसमोर ठेऊन कोरोनाच्या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी येणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन उखाणे स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठीचे व्हिडिओ येत्या दि. १० सप्टेंबरपर्यंत माविमच्या जिल्हा कार्यालयांकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्‍पर्धा सर्व महिलांसाठी खुली राहील. ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी नाविण्‍यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच काही ऐतिहासिक मूल्य असणारा, दीड ते जास्तीत-जास्त तीन मिनिटांचा उखाण्याचा व्हिडीओ तयार करून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडे 10 सप्‍टेंबरपर्यंत पाठवावा.

उखाणे निवडीचे निकष –
उखाणे नाविण्यपूर्ण असावेत. त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा.
उखाणा हा मौखिक साहित्यिक प्रकार असला तरी त्यातील आशय हा फक्त प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा.
आपण सर्वसाधारणपणे आपल्या यजमानांच्या नावाभोवती उखाणे गुंफत असतो, पण या स्पर्धेत आपल्याला उखाणे समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तीरेखा (विशेषत: स्त्री व्यक्तीरेखा) यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी असल्याने उखाणा या व्यक्तिमत्तवांच्या भोवती गुंफणे अपेक्षित आहे.

उखाणा स्त्री – पुरुष समानता या मुल्यांचा पुरस्कार करणारा असावा. उखाणा कमीत कमी दीड ते जास्तीत-जास्त तीन मिनीटांचा लांब असावा. उखाणा मुखोदगत/ पाठ असावा. प्राप्त उखाण्याची जिल्हास्तरावर परीक्षकांकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे 3 व माविमेत्‍तर महिलांचे 3 क्रमांक काढून 6 व्हिडीओ विभागीय स्तरावर पाठविण्यात येतील. प्रति जिल्हा 6 याप्रमाणे साधारण एकूण 36 पात्र व्हिडीओ एका विभागीय स्तरावर प्राप्त होतील ज्यामधून परीक्षकांकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे 3 व माविमेत्‍तर महिलांचे 3 असे 6 व्हिडीओ मुख्यालयाकडे पाठविले जातील. 36 पात्र व्हिडीओमधून राज्यस्तरावर केवळ माविमच्‍या महिलांचे क्रमांक काढले जातील.
विभागीयस्तरावर 36 पात्र महिलांना स्‍पर्धेत सहभागाबाबत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्‍यात येईल आणि राज्‍यस्‍तरीय विजेत्या 6 महिलांना राज्य साहित्य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठीची संधी देण्‍यात येईल.

  • अधिक माहितीसाठी माविम मुख्यालयाचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री.महेंद्र गमरे (भ्रमणध्वनी क्र.९८९२५४८८५४) यांच्याशी किंवा जिल्हा कार्यालयांशी संपर्क साधावा. महामंडळाचे संकेतस्थळ www.mavimindia.org वर सर्व जिल्हा कार्यालयांचे संपर्क, संबंधित अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक व इमेल उपलब्ध आहेत.
  • कोल्हापूरसाठी – जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ,जिल्हा कार्यालय, कोल्हापूर येथे ०२३१-२६६७२४२ या दूरध्वनी क्रमांकावर व kolhapur.mavim@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधावा.
Team Lokshahi News