मुंबई | दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीच्या (President Election) हालचालींनी वेग घेतलाय. येत्या 18 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत 24 जुलैला संपणार आहे. तत्पूर्वी, 29 जूनपर्यंत नवीन राष्ट्रपती पदासाठी अर्ज करावा लागणार आहे.

या निवडणुकीत भाजपला (BJP) घेरण्यासाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलीय. भाजपच्या विरोधातील जवळपास सर्वच पक्ष या निवडणुकीत एकत्र आले आहेत. या विरोधकांनी सर्वानुमते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव सुचवलं होतं. पण शरद पवारांनी हा प्रस्ताव प्रांजळपणे नाकारल्यानंतर विरोधकांकडून आता महाराष्ट्रातील (Maharashtra) आणखी एका दिग्गज नेत्याला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबतची चर्चा सुरु आहे. विरोधकांकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यासाठी हालचाली देखील वेगाने घडताना दिसत आहेत.

राष्ट्रपदीपदासाठी भाजपकडून काहीजण इच्छुक आहेत, पण त्यांची नावे अजून जाहीर झालेली नाहीत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, व्यंकया नायडू, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांकडून सर्वसमावेश असा उमेदवार शोधला जात आहे. त्यासाठी २९ जूनपर्यंत अर्ज करावे लागणार असल्याने अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीचे निमंत्रण आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेसच्या बैठकीसाठी तातडीचे निमंत्रण मिळाले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीने सुशीलकुमार यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतल्याने शिंदे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे सुशीलकुमार यांचे रविवारचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदही भुषवलं आहे. याशिवाय त्यांनी देशाचं केंद्रीय गृहमंत्रीपदाची देखील धुरा सांभाळली आहे. त्यांचा राजकीय अनुभव पाहता विरोधकांकडून सुशीलकुमार यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा आहे.

दरम्यान, २००२ मध्ये भैरोसिंग शेखावत यांच्याविरूद्ध उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी सुशीलकुमार शिंदे यांना मिळाली होती. त्यावेळी मतांच्या अंदाजात शेखावत विजयी होणार हे निश्चित होते. तरीही शिंदे यांनी पक्षाचा आदेश मानून उमेदवारी अर्ज भरला होता. आता राष्ट्रपतीपदासाठी भाजप देईल, तोच उमेदवार विजयी होईल, अशी स्थिती आहे. तरीदेखील, या निवडणुकीत शिंदे हेच राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे.

शरद पवारही दिल्लीला रवाना
विशेष म्हणजे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत दिल्लीत 21 जूनला विरोधी पक्षांची एकत्रित बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणुकीबाबत खलबतं होणार आहेत.