अन्यथा भूविकास बँकेचे कर्मचारी करणार मंत्रालयासमोर आत्मदहन…

कोल्हापूर | राज्यातील भूविकास बँक कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता १४ ऑगस्ट पर्यंत करावी, अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन राज्य सहकारी ‘कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक कर्मचारी संघटनेचे कार्यवाह एम. पी. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. 

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने दि. २४ जुलै २०१५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा भूविकास बँका बंद करण्याचा निर्णय झाला. त्यापुढे याबाबत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही. शासन निर्णयानुसार बँकांची मालमत्ता विकून त्यामधून येणार्‍या पैशातून संबंधित बँकेचे अधिकारी व कर्मचारी (सेवानिवृत्तीसह) यांना पैसे देणेसाठी विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी शासनाने बँकांची मालमत्ता ताब्यात घेऊन, शासनानेच कर्मचारी वर्गाची आर्थिक देणी द्यावीत. याबाबतचा मंत्री मंडळाचा प्रस्ताव सहकार विभागाने अर्थ विभागाकडे सादर केलेला आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष खा.आनंदराव अडसूळ यांनी नियमित पाठपुरावा केला. तरीही अर्थ विभागाने प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 

कर्मचार्‍यांच्या मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे औषधपाणी आदी अडचणींमुळे काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या ही केल्या आहेत. ही अतिशय गंभीर बाब असूनही शासनस्तरावर याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी फाईल नं एल. डी. बी./१०१५/प्र.क्र.२८/सी. का. ना.७६७ या प्रलंबित प्रस्तावावर १४ ऑगस्ट २०२० पूर्वी संपूर्ण निर्णय न झाल्यास कर्मचार्‍यांना मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. यावर शासन काय निर्णय घेते हे पहावे लागणार आहे.