Categories: गुन्हे

पालघर : साधू हत्याकांडप्रकरणी ‘या’ वरिष्ठ निरीक्षकांसह दोन पोलीस बडतर्फ

पालघर | पालघर हत्याकांडप्रकरणी कासा पोलिस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ निरीक्षकांसह दोन पोलीस अधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. दोन महंतांसह चालकाची हत्या होत असताना, बघ्याची भूमिका घेत, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यात कासा पोलिस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव काळे, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र दिनकर साळुंखे आणि पोलिस कर्मचारी नरेश नगीन धोडी या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून सोमवारी बडतर्फीचे आदेश काढण्यात आले आहेत. 

१६ एप्रिलच्या रात्री अंत्यसंस्कारासाठी गुजरातच्या दिशेने चाललेल्या महंत कल्पवृक्षगिरी महाराज (वय ७०), तसेच सुशीलगिरी (३५) आणि त्यांच्या गाडीचा चालक नीलेश तेलगडे (३०) यांना गडचिंचले येथे जमावाने गाडी बाहेर काढून त्यांची निर्घृण हत्या केली होती. या महंतांना चोर समजून जमावाने त्यांची गाडी रस्त्यात अडविली होती. हे महंत मदतीसाठी पोलिस ठाण्यात गेले असता, पोलिसांच्या समोरच जमावाने दगड, लाठ्याकाठ्या आणि कुऱ्हाडीसारख्या हत्यारांनी ठेचून वार करून या महंतांना ठार केले. राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, तातडीने संबंधितांना निलंबित केले होते. त्यानंतर हा तपास समांतर पद्धतीने सुरू केला आहे. त्यानुसार सोमवारी (ता. ३०) कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी संबंधित तिघांना बडतर्फ करण्याचा आदेश काढला.

Team Lokshahi News