Categories: पर्यावरण सामाजिक हुणार तरास, पण गुणं हमखास..

पंचगंगा नदीची झाली गटारगंगा; प्रदुषण नियंत्रण महामंडळाला जाग कधी येणार?

लेखन – स्नेहल शंकर
भारतीय संस्कृती मध्ये नद्यांना अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा नदीच्या काठानेच उमटल्या. म्हणून नदीची दैवतरुपी पूजा करण्याची पद्धत आपल्या संस्कृती मध्ये दिसते. मात्र पवित्र मानली गेलेली नदी स्वच्छ, प्रदूषण मुक्त व्हावी सतत खळखळती वाहावी याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. या नद्यांच्या प्रदूषणाचे खरे कारण दडले आहे, ओरबाडून घेण्याच्या मानवी वृत्तीत आणि कारवाई न करता सुस्त आणि पैसे खाऊन मगरमस्त झालेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या अनास्थेत. कोल्हापुरात हि पंचगंगेच्या बाबतीत काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी पात्रात दूषित पाणी सोडून नदीला गटारगंगेचे स्वरूप देण्यात येथील साखर कारखान्यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी कारखानदारी बरोबरच सध्या खाजगी साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु हे साखर कारखाने बऱ्याचदा नदी प्रदूषणाचे नियम पायदळी तुडवून निगरगट्टपणे आपली कारखानदारी करताना दिसतात.

पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया साखर कारखाना देखील सध्या हाच प्रकार करत असून कारखान्यातून निघणारे दूषित पाणी थेट नद्यांमध्ये मिसळत आहे. दूषित पाणी व हवेमुळे कारखाना परिसरातील लोकांना साथीचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचा रोग यासारख्या विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी होत आहेत. कारखाना परिसरातील शेतात रात्रीच्या दरम्यान रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शेतजमीनी नापीक होत असून शेतात काळे पाणी उतरत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळाची दत्त दालमिया कारखान्यावर कारवाई न करण्याची भूमिका शंकास्पद वाटते आहे. वास्तविक नद्यांचे प्रदूषण होऊ न देणे ही जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळाची तसेच महापालिकेची जबाबदारी आहे. पण हव्यासापोटी पैसे घेऊन प्रकरणे दाबणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे पंचगंगेची आज अशी गटारगंगा झाल्याचे दिसते. दत्त दालमियातून निघणारे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारी यंत्रणा आणि तसे न केल्यास मिळणाऱ्या शिक्षेचे भय या निर्ढावलेल्या कारखान्याला राहिलेच नाही. त्याचे सर्व श्रेय जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळाला दिल्यास योग्यच ठरेल. केवळ नमुने तपासणीचे नाटक रंगवून जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करणाऱ्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवरच कडक कारवाई करण्याची मागणी यापूर्वी कित्येकदा जिल्हावासियांकडून करण्यात आली. मात्र अनेक वर्षापासून जिल्ह्यातील नदी आणि वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या दत्त दालमिया कारखान्याबाबत जिल्हा प्रदुषण नियंत्रण महामंडळ कडक भूमिका घेत नसल्याचेच यावरून दिसून येत आहे.

जिल्ह्यातील जाणते राजकारणी आणि लोकप्रतिनिधींची डोळेझाक
अस्तित्वात असलेल्या मातीचे सोने करण्याऐवजी सोन्याची माती करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्याऱ्या  जाणत्या राजकारण्यांची  परंपराच जिल्ह्याला लाभली आहे. ‘नदी शुद्ध ठेवल्यास पाण्याचे राजकारण करता येणार नाही’ असा राजकीय हिशोब घालणाऱ्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचीही अप्रत्यक्षपणे या कारखान्याला मदतच होते आहे. त्यातच आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्याची आणि नदीच्या होणाऱ्या प्रदूषणाकडे षंढपणे बघत बसण्याची भूमिकाच जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घेतली असल्याची ओरड परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नदी प्रदूषणाच्या पातळीत घट झाली होती. मात्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे ती पुन्हा वाढू लागली आहे. होणाऱ्या प्रदूषणा संदर्भात लोकशाही न्यूजने प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरु केला आहे. यासंदर्भात कोणतीही कारवाई न झाल्यास लोकशाही न्यूज कडून ठोस पुराव्यांसहित या प्रकरणाची मालिका चालू करण्यात येणार आहे.

Snehal Shankar

Journalist