कोल्हापूर | जिल्ह्यात सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे अखेर पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. आज रात्री १० वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी ३९ फूट इतकी नोंदली गेल्याने इशारा पातळी ओलांडली गेली आहे. (इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फुट आहे). जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर सूरूच असून जिल्ह्यात १०२ बंधारे पाण्याखाली गेले आहे. यामुळे नद्यांची पाणी पातळीही सातत्याने वाढत असून प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर काही गावांच्या स्थलांतरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
कोल्हापूरसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना – राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर
कोल्हापूर परिसरात दिवसभरात सूरु असलेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन दलाच्या दोन तुकड्या कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. कोल्हापूरमधील पावसाची स्थिती लक्षात घेऊन राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूरला पाठविण्या बाबत मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी देखील कोल्हापूरसाठी तत्काळ तुकड्या रवाना करण्याचे निर्देश दिल्याचे राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले
दरम्यान काल रात्रीपासून कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आ. चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसेवक शारंगधर देशमुख व राहुल चव्हाण यांच्यासोबत शहरातील काही ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच, संभाव्य पूर परिस्थितीसाठी सर्व यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचनाही यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.