Categories: सामाजिक

पन्हाळा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री सतेज पाटील

पन्हाळा | अतिवृष्टीमुळे पन्हाळागड व गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांचे व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. या गावांच्या सुरक्षेच्या दृष्टिने कायस्वरुपी उपाय योजना करण्यासाठी सर्वसमावेश आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिल्या.

पन्हाळगड व परिसरातील गावात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री पाटील यांनी केली. बुधवार पेठ पन्हाळा येथील तीन दरवाजा येथे पावसाने उखडलेल्या रस्त्याची, रेडेघाट जंगलातून ढग फुटी सदृश्य पावसाने खचलेल्या भागाची, सिकंदर मुजावर यांच्या घराची तसेच साधोबा तलावाची पाहणीही पाटील यांनी यावेळी केली. यानंतर पन्हाळा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

यावेळी पाटील म्हणाले, ज्या भागात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्त भागाची तीन टप्यात वर्गवारी करा. यामध्ये नुकसानग्रस्त कुटुंबांच्या प्रस्तावांना प्राधान्य द्यावे. पन्हाळगडासह पायथ्याशी असलेल्या गावांचा सुरक्षेच्या दृष्टीने कायम स्वरूपी उपाय योजना करणे महत्वाचे आहे. भूस्खलन होऊन रस्ते बंद होऊ नयेत, यासाठी कायमस्वरुपी उपाय योजना करणे गरजेचे आहे. यासाठी पुरातत्व विभाग आणि वन विभागाकडून आवश्यक असणारे परवाने व तांत्रिक बाबींची पुर्तता करुन सर्वसामावेशक असा आराखडा तयार करावा. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. या आराखड्यास शासनस्तरावर मान्यतेसाठी पाठपुरावा केला जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस नगराध्यक्ष रुपाली धडेल, उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, मुख्याधिकारी स्वरूप खारगे, कार्यकारी अभियंता एस. एस. माने, कार्यकारी अभियंता एस. व्ही. काटकर, गट विकास अधिकारी तुलसीदास शिंदे, पोलीस निरीक्षक ए.डी.फडतरे, दिनकर भोपळे, चैतन्य भोसले, रणजित शिंदे आदी उपस्थित होते.

Team Lokshahi News