Categories: सामाजिक

मी भाजप सोडणार नाही म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पंकजा मुंडेंचा कौतुकाचा वर्षाव

औरंगाबादभाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर कौतुकाचा वर्षाव करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मराठवाड्याच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतील असे म्हणटले आहे. पंकजा मुंडे यांनी औरंगाबादमध्ये मराठवाड्याच्या प्रश्नांवर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. एका लहान मुलाच्या हातून पाणी पिऊन त्यांनी उपोषण मागे घेतलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हा कौतुकाचा वर्षाव केला.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, “महाराष्ट्रात एक आगळंवेगळं सरकार अस्तित्वात आलं आहे. जे कधी सोबत बसत नव्हते ते एकत्र येऊन सरकारमध्ये आले आहेत. पहिल्यांदा ठाकरे घरातील व्यक्ती मुख्यमंत्री झाला आहे. एक संवेदनशील मुख्यमंत्री या मागण्या कधीही नाकारु शकणार नाही. या सरकारच्या मुख्यमंत्र्यांमध्ये या मागण्या पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आहे. या सरकारला शुभेच्छा. त्यांनी आमच्या सरकारपेक्षा चांगलं काम करावं आणि लोकांचं मन जिंकावं. हे उपेक्षांचं उपोषण नाही, तर अपेक्षांचं उपोषण आहे. मराठवाड्याला पाण्याचं स्वप्न पडलं आहे. ते स्वप्न या सरकारनं पूर्ण करावं. पाणी मिळालं तर कर्जमाफीची आणि आत्महत्येची गरजच पडणार नाही”, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. 

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेलं हे उपोषण भाजपनं यशस्वी केलं. हे उपोषण मराठवाड्यासाठी आणि मराठवाड्यातील पाण्यासाठी आहे. मी राजकारणात येण्याआधीपासून पाण्यावर काम करत आहे. त्यामुळे पाणी हा प्रश्न माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठवाड्यात मी समाजसेवक म्हणून काम करणार आहे. आज केलेलं उपोषण तुमच्या बळावर केलं आहे. माझ्या बरोबर उपोषण करण्यासाठी अनेक कार्यकर्ते आले आहेत. त्यांचेही आभार, असंही पंकजा मुंडे यांनी यावेळी नमूद केलं.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: औरंगाबाद ठाकरे सरकार दुष्काळी योजना पंकजा मुंडे उपोषण मराठवाडा दुष्काळ मराठवाडा पाणी प्रश्न सरकारी योजना