Categories: राजकीय हुणार तरास, पण गुणं हमखास..

जय श्रीराम ते सत्यमेव जयते.. पार्थचा अर्थ!

स्नेहल शंकर – 
सुशांत सिंग रजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने सीबीआयच्या पदरात पडला आहे. बिहारच्या या सुपुत्रामुळे सत्ताधारी सेनेचा पुरता रंग उडाला आहे. दुसरीकडे यात आणखी रंगत आणण्याचे काम भाजपची मंडळी करीत आहे. याचा संबंध बिहार निवडणूकीशी तर नाही ना? भाजप व्यतिरिक्त ही यात कोणी सहभागी आहे का? पार्थ पवारांनी केलेली सीबीआयची मागणी काय सूचित करते? थोरल्या साहेबांनी पार्थला अपरिपक्व म्हणणे आणि त्याच्या मागणीला काडीमात्र किंमत देत नसल्याचं जाहीररित्या बोलणे हे नक्की काय सुचित करून जाते? पार्थ पवारांच्या तोंडून नक्की कोणता पोपट बोलतो आहे? पार्थ पवार खरचं अपरिपक्व आहेत की राजकारणात पुन्हा सक्रीय होण्यासाठी खेळपट्टी तयार करीत आहेत? अशा एक ना अनेक शंका सध्याच्या घडीला उपस्थित होत आहेत. हे प्रकरण वरून कितीही सोपे असल्याचा भास निर्माण होत असला तरी ते तितकसे सोपे नसल्याचेच चित्र सध्या होत असलेल्या घडामोडीमुळे दिसत आहे. राजकारण्यांच्या सूचक भूमिका आणि वक्तव्यांसोबतच भविष्यात पुढे येणाऱ्या तथ्यांनी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघणार याची मात्र निश्चितच खात्री देता येते.

१४ जून रोजी सुशांत सिंग राजपूत या ख्यातनाम अभिनेत्याने वांद्र्यातील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येनंतर त्याचे सोपस्कर पार पडले. मात्र त्यानंतर जी राळ उडाली त्याकडे डोळसपणे पाहिल्यास नक्कीच कुठे तरी पाणी मुरत असल्याचा दाट संशय आल्यावाचून राहत नाही. सुरवातीलाच सुशांतच्या आत्महत्येला समस्त बॉलिवूडकरांना वेठीस धरत कंगणा राणावत या अभिनेत्रीने काही ख्यातनाम दिग्दर्शकांची नावे घेऊन या लोकांना राजकीय व्यक्तींचा पाठिंबा असल्याचे नॅशनल टेलिव्हिजनवर जाहिररित्या सांगितले. त्यानंतर दिवसेंदिवस हे प्रकरण चांगलेच तापू लागले. देशात सत्तेत असलेल्या आणि राज्यात विरोधात बसलेल्या भाजपने याप्रकरणाचा  सीबीआयकडून तपास करण्याचा धोशाच लावला. गढूळ झालेल्या वातावरणाने पोलिस (मुंबई, बिहार) असो वा राज्यसरकारे सर्वांच्याच भूमिकेकडे साशंकतेने पाहिले जाऊ लागले. याला अनेक कंगोरे आहेत. जसे की,
१. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल न करणे.
२. तद्ननंतर बिहार पोलिसांची एंट्री.
३. येऊ घातलेली बिहार निवडणूक
४. भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ४ ऑगस्ट रोजी याप्रकरणी घेतलेली पत्रकार परिषद (कोणाचेही नाव न घेता सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी एका मोठ्या आसामीचा हात असल्याचे तसेच मुंबई पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? असे प्रश्न उपस्थित केले.)

५ त्याचदिवशी ट्विटरवर आदित्य ठाकरे यांनी ‘हे तर गलिच्छ राजकारण’ या नावाखाली आपली भुमिका स्पष्ट केली. (आदित्य ठाकरेंचे नाव कोणीही जाहिररित्या घेतले नव्हते, मग तरीही त्यांना ‘आ बैल मुझे मार’ अशा प्रकारची भूमिका का घ्यावी लागली हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो.)

वरील घटनांचा क्रम पाहता, खरंच सुशांतला न्याय मिळवून देण्याचा मुद्दा इथे विवादास्पद ठरतो. याप्रकरणी विरोधक काय किंवा स्वकीय, सर्वांनीच सीबीआय चौकशीचा घाट घातला. याबाबत २७ जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची प्रथम मागणी करणारे पार्थ पवार होते. त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या लेटरहेडवरील मागणीचे पत्र सोशल मिडीयावरही पोस्ट केले. त्यानंतर लगेचच माध्यमांमध्ये ही बातमी प्रसिध्द झाली, मात्र त्यांच्या मागणीला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही, कालऔघात माध्यमे आणि लोकही या मागणीला विसरून गेले. अशी ज्वलंत मागणी करूनही, उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र पार्थ पवार कोणत्याही राजकीय चर्चेच्या वर्तुळात नव्हते पण त्यांच्या कूटनितीज्ञ आजोबांनी त्यांच्यावर एक गुगली टाकून राजकीय चर्च्यांच्या केंद्रस्थानी आणले.

तर विषय असा झाला की, १२ ऑगस्टला शरद पवारांना पत्रकारांनी, सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणी पार्थने सीबीआय चौकशीची मागणी केली असल्याचा आणि यावर तुमची भुमिका काय हा प्रश्न विचारला. यावेळी पवार म्हणाले की, मी माझ्या नातवाच्या म्हणण्याला काडीची किंमत देत नाही, तो अपरिपक्व आहे. पण मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की माझा महाराष्ट्र (मुंबई) पोलिसांवर विश्वास आहे आणि जर कोणाला सीबीआय चौकशी हवी असेल तर माझा त्याला विरोध असण्याचे कारण नाही. येथेच माध्यमांनी पवारांच्या गुगलीचा अर्थ काढायला घाईगडबड करत नातवाचा मुद्दा हायलाईट करून मुळ मुद्दाच दुर्लक्षित केला. पार्थला अपरिपक्व म्हणतानाचं पवारांनी सीबीआयला आपला विरोध नसल्याचे जाहिररित्या सांगितले. पार्थला अपरिपक्व म्हणटल्याचा अर्थ लावायचा झाल्यास २०१४ सालच्या भाजप – सेना सत्तावाटपाच्या खोडा घालण्यासाठी पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. २०१४ साली खेळलेल्या या खेळीबद्दल राजकीय तज्ञांनी अनेक तर्कवितर्क मांडले, परंतु आजपावेतो या खेळीचे गूढ कोणालाही उकलता आले नव्हते. ते गूढ स्वतः शरद पवारांनी २०२० साली संजय राऊतांच्या मुलाखतीत उलगडले. म्हणजेच महाविकास आघाडीची बीजं त्यांनी २०१४ सालीच पेरून ठेवली होती. 

वरील खेळी सांगण्याचे तात्पर्य २०२० साली पार्थ पवारला फटकारून त्याची पुढची राजकीय वाटचाल सुकर करण्याचा प्रयत्न त्यांनी येथे निश्चितच केलेला दिसतो. भविष्यात हा प्रयत्न त्यांनीच केल्याचे सांगितल्यास आश्चर्य वाटू नये. येथे पार्थ पवार अपरिपक्व असल्याचे दाखले कोणत्याही प्रसिध्द राजकीय तज्ञाने दिले तरी, मूळ मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही तो म्हणजे पार्थने ही मागणी स्वतःच्या लेटरहेडवरून प्रसिध्द केली. तो जर अपरिपक्व असता तर त्याने स्वतःची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीच्या वळचणीचा आधार घेतला असता. सध्या तो पक्षाचा सदस्य असला तरी तो पक्षात कोणतेही मानाचे स्थान भूषवत नाही. लोकसभा हरल्यापासून तो कोणत्या चर्चेतही नाही. प्रत्येक राजकारण्याला राजकारणात आपले अस्तित्व आहे हे सिध्द करण्यासाठी माध्यमात चर्चेत रहावे लागते. मात्र पार्थचे स्थान या प्रत्येक चौकटीत गौणच दिसते. एकीकडे नातवाला जाहिररित्या फटकारून राष्ट्रीय माध्यमांमध्ये त्याला आठ दिवस चर्चेत ठेवणे तर दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या सीबीआयला ग्रीन सिग्नल देणे हे फक्त आणि फक्त पवारच करू शकतात.

आजवर पवार कुटूंबात दुफळी असल्याचे बरेच तर्कवितर्क मांडले गेले. आजोबांनी जाहिररित्या फटकारल्यापासून या प्रकरणावर पवार कुटूंबियातील एकाही सदस्याने यावर प्रतिक्रिया दिली नाही. म्हणजेच घरात सगळे आलबेल असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय? याची खलबते सुरू असणार हे मात्र निश्चित. 

Snehal Shankar

Journalist