Categories: Featured आरोग्य

सीपीआर मध्ये इतर आजारांवरील उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांवर आता शहरातील विविध रूग्णालयात उपचाराची सोय

कोल्हापूर। येथील सीपीआर रुग्णालय सध्या कोरोना संशयित आणि कोरोना बाधित रुग्णांसाठी संपूर्णपणे राखीव ठेवले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना व्यतिरिक्त इतर आजारावर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी शहरामध्ये अन्यत्र व्यवस्था केली आहे. याचा आढावा घेताना कोरोना संशयित अथवा बाधित रुग्णांना प्राधान्य द्या. परंतु, इतर जे रुग्ण येत आहेत त्यांचीही नेहमीप्रमाणे काळजी घ्या, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज केली आहे. (Patients coming to CPR for other ailments are now being treated at various hospitals in the city)

सीपीआर रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त इतर व्याधी व आजाराने त्रस्त असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. त्यासाठी आरोग्य विभागाने कोरोना व्यतिरिक्त इतर उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांसाठी शहरातील विविध २१ दवाखान्यांमध्ये उपचाराची व्यवस्था केली आहे. याचा आढावा घेताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, सीपीआर हॉस्पिटल पूर्वीपासून सर्वसामान्य गरीब रुग्णांसाठी एक आधारवडासारखे काम करीत आले आहे. त्यामुळे जिल्ह्यांमधून ज्यांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार परवडत नाहीत, असे अनेक रुग्ण सीपीआरमध्ये दाखल होत असतात. 

यामध्ये प्रसुतीसाठी येणाऱ्या महिला, अपघात विभागांकडे येणारे रुग्ण, सर्पदंश आणि बरेचसे असे आजार आहेत, ज्यांच्यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे असते. आरोग्य विभागाने अशा सर्व रुग्णांसाठी शहरात ठीक ठिकाणी वेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचाराची व्यवस्था केली आहे. परंतु बाहेरून आलेल्या रुग्णांना याची माहिती नसते. त्यामुळे सीपीआरमध्ये एक माहिती कक्ष सुरू करावा आणि अशा येणाऱ्या रुग्णांना नेमके त्याने कोठे जायचे याबाबतचे मार्गदर्शन व मदत करावी. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Rajendra Hankare