Categories: अर्थ/उद्योग तंत्रज्ञान

प्ले स्टोअरवरून गायब होताच Paytmने वापरकर्त्यांसाठी केला ‘हा’ महत्वाचा खुलासा..!

नवी दिल्ली | आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी पेटीएम (Paytm) आणि पेटीएम फर्स्ट गेम (Paytm First Game) हे दोन्ही अॅप गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीचे हे अॅप प्ले स्टोअरवर हटवण्यात आले असून लाखो युझर्सना आता याचा फटका बसणार आहे. पेटीएम मनी, पेटीएम मॉल आणि अन्य कंपनीच्या मालकीच्या इतर अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. मात्र Paytm आणि Paytm First Game हे दोन अॅप काढून टाकण्यात आले आहे. 

गुगलनं यापूर्वी म्हटल्यानुसार ते ऑनलाइन कॅसिनो किंवा कोणत्याही नियमनाविरोधातील जुगार खेळांना समर्थन देत नाहीत. या ऍपच्या माध्यमातून बाहेरच्या वेबसाइटलाही पैशाच्या माध्यमातून जुगार खेळण्याची परवानगी देण्यात येत होती. तसेच जिंकणाऱ्याला पैसे/रोख बक्षिसे दिली जात असल्याचं गुगलने आपल्या निवेदनात सांगितलं आहे. पेटीएम हे अ‍ॅप जरी हटविण्यात आले असले तरीही पेटीएम मॉल, पेटीएम फॉर बिजनेस, पेटीएम मनी अ‍ॅप आताही प्ले स्टोअरवर आहेत. तसेच अ‍ॅपल स्टोअरवरून पेटीएम डाऊनलोड करता येणार आहे. यामुळे चिंता केवळ अँड्रॉईड धारकांसाठीच आहे. 

डिजीटल बॅंकीगमधील भारताचा मोठा आधार असलेल्या पेटीएमला यामुळे जोरदार धक्का बसला आहे. याचबरोबर करोडो युजरच्या पैशांचे काय होणार? पेटीएम बँक, पेटीएम वॉलेटवर असलेल्या पैशांचे काय होणार याची चिंता आता लोकांना लागून राहिली आहे. यावर पेटीएम कंपनीने केलेल्या खुलासानुसार, आम्ही पुन्हा येणार असल्याचे म्हटले आहे. काही काळासाठी Paytm Android app हे Google’s Play Store वरून डाऊनलोड किंवा अपडेट करता येणार नाही. ते लवकरच पुन्हा उपलब्ध होईल, असे म्हटले आहे. तसेच तुमचे पेटीएमवर असलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही नेहमीप्रमाणे व्यवहार करू शकता, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Paytm