कोल्हापूर | पीएम किसान योजनेत अपात्र ठरलेल्या लोकांकडून पैसे वसूल करण्याचे काम सध्या सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल १४ हजार ६६७ जणांचा यात समावेश असून वसूल केली जाणारी रक्कम १७ कोटी ६० लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत सुरू असेलले घोटाळे ध्यानात घेत चुकीच्या पध्दतीने या योजनेचा लाभ उकळणाऱ्यांना वेसण घालणे सुरू केले आहे. त्यासाठी प्रत्यक्ष पडताळणी करून खऱ्या लाभार्थींपर्यंत लाभ पोहचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
पीएम किसान योजना ही देशातील सर्वात लोकप्रिय योजना असून जवळपास ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. दरवर्षी तीन समान हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाव्दारे पैसे जमा करणारी ही देशातील एकमेव योजना आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात ही योजना कोट्यावधी शेतकऱ्यांना लाभदायक ठरल्याचे पहायला मिळाले. परंतु काही लोकांकडून चुकीच्या पध्दतीने या योजनेचा लाभ उकळला जात असल्याचेही दिसून आल्याने सरकारने कडक धोरण अवलंबून अपात्र लोकांची नोंदणीच रद्द करून दिलेली रक्कम वसूल करण्यास सुरवात केली आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ६ लाख ३८ हजार शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेत नोंदणी केली असून ५ लाख १९६७ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, त्यांनी त्यांच्या नावातील चुका, आधार कार्डवरील चुका, बॅंकेतील नाव आणि खाते नंबरमधील चुका, अशा काही तांत्रिक बाबींची पडताळणी करून चुका दुरूस्त करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा शेतकऱ्यांना लाभ घेण्यास पात्र असून देखील लाभ मिळणार नाही.