PM किसान : ६ हजार रूपये मिळवण्यासाठी आणखी २ कोटी शेतकरी ‘अशी’ करू शकतात घरबसल्या नोंदणी

नवी दिल्ली | केंद्रसरकारची महत्वाकांक्षी योजना ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रूपयांचे अनुदान मिळते. हे अनुदान मिळवण्यासाठी आता शेतकरी वैयक्तिकरित्याही स्वतः नोंदणी करू शकतात. केवळ मोबाईलच्या माध्यमातून देखील ही नोंदणी करता येत असून वैयक्तिकरित्या नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा होत आहेत. सरकारने जमीन धारणेची अट काढल्याने आता नवीन २ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरील लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावात, बॅंक नंबर मध्ये, आधार नंबर मध्ये चुक झाली असल्यास या चुका देखील शेतकऱ्यांना स्वतःच दुरुस्त करता येतात. केंद्रीय कृषि मंत्रालयाने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर थेट विश्वास दाखवला आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्याकरिता थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी pmkisan.gov.in संकेतस्थळावर फार्मर कॉर्नरवरील नवीन नोंदणी या लिंकवर थेट अर्ज भरता येतो. अर्जाची भाषा इंग्रजी असली तरी अर्जाची रचना सोपी आहे.

या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थांशिवाय एक रूपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे. नावात चुक झाल्यास दुरूस्ती करता येत आहे. तसेच या योजनेतील आपल्या सहभागाची सद्यस्थिती देखील शेतकऱ्याला समजत आहे.
या संकेतस्थळावर फार्मर्स कॉर्नरमध्ये विविध पर्याय देण्यात आले आहेत.
१. नवे शेतकरी नोंदणी,
२. नवीन स्वत: नोंद शेतकरी दुरूस्ती,
३. आधार क्रमांक दुरुस्ती,
४. शेतकऱ्याच्या अनुदानाची सद्य:स्थिती,
५. लाभार्थ्यांची यादी,
६. स्वतः किंवा सीएससीमधून केलेल्या नोंदणीची सद्य:स्थिती
७. डाऊनलोड पीएम किसान मोबाईल अॅप
गरजेनुसार शेतकऱ्याने पर्यायाची निवड करून आपली माहिती जमा करणे गरजेचे आहे. 

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या नवीन  नोंदणीसाठी क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा आधार नंबर टाकावा लागतो. त्यानंतर शेजारी येणारा कॅप्चाकोड भरून द्यावा लागतो. अगोदर नोंदणी झाली असल्यास स्क्रीनवर तसा संदेश दाखविला जातो, अथवा नोंदणी झालेली नसल्यास थेट अर्ज उघडला जातो. याठिकाणी राज्य निवडून आपल्या गावाची माहिती भरल्यावर शेतकऱ्याला स्वतःचे नाव टाकावे लागते. त्यानंतर कॅटेगिरीत पुन्हा जनरल, एससी किंवा एसटीवर क्लिक करावे लागते. यानंतर जमीनधारणा एक-दोन हेक्टरपर्यंत आहे की त्यापेक्षा वेगळी असे पर्याय येतात. ते क्लिक केल्यानंतर बॅंकेचा आयएफसी कोड व बॅंकेचे नाव, अकाऊंट नंबर टाकल्यास शेजारी ‘सब्मिट फॉर आधार ऑथिन्टिकेशन’ असा पर्याय येतात. तेथे क्लिक केल्यानंतर पुढे मोबाईल नंबर, जन्मतारिख व वडिलांचे नाव टाकावे लागते.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज भरताना सातबारा वैयक्तिक (सिंगल) आहे की सामायिक (जॉईंट) आहे यावर क्लिक करावे लागते. शेतकऱ्याला पुढे त्याचा सर्वेनंबर विचारला जातो. तो भरल्यानंतर डाग किंवा खासरा नंबर विचारला जातो. मुळात ही संज्ञा आपल्याकडे नसून उत्तर भारतातील असल्याने शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी शून्य टाकावे. पुढे आपले क्षेत्र टाकून अॅड या पर्यायाला क्लिक केल्यानंतर ‘मी ही माहिती खरी असल्याचे घोषणापत्र लिहून देत आहे’ अशी ओळ येते, त्याच्या पुढे क्लिक करून ‘सेव्ह’ पर्याय दाबला की, शेतकऱ्याचा अर्ज पोर्टलवर नोंदणीसाठी पुढे जातो.

  • शेतकरी घर बसल्या नोंदणी करू शकतात. 
  • किसान सन्मान योजनेत नोंदणी किंवा दुरुस्ती करण्यापूर्वी आधार नंबर, बॅंक खाते पुस्तक आणि सातबारा उतारा तयार ठेवावा.
  • इंटरनेट सुविधा नसल्यास गावातील आपले सरकार सेवावर केंद्रावर (सीएससी) फक्त १५ रुपये शुल्क देऊन नोंदणी करता येते.
  • दुरुस्तीसाठी केवळ १० रुपये शुल्क असून कोणत्याही सीएससीचालकाने जाद रक्कम आकारल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करता येते.

इथंपर्यंत शेतकऱ्यांने अर्ज भरण्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर पुढची जबाबदारी तलाठी कार्यालयावर येते. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याने आपला सातबारा, खाते पुस्तकाची प्रत आणि आधारनंबरची नक्कल यांच्या ‘हार्डकॉपीज’  झेरॉक्स आपल्या गावच्या तलाठी कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांच्या अर्जावर पुढील प्रक्रिया केली जाते. कारण, राज्य शासनाने शेतकरी सन्मान योजनेची ग्रामपातळीवरची माहिती संकलित करण्याची जबाबदारी तलाठ्याला दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्जासाठी भरलेल्या नोंदीच्या वरील तीन कागदांच्या प्रती तलाठ्याच्या ताब्यात देऊन त्या मिळाल्याची ‘पोच घेऊन ठेवणे’ अत्यंत गरजेचे आहे. ही पोच कालांतराने आपण तलाठी कार्यालयाकडे या योजनेसाठी कागदपत्रे जमा केली असल्याचा पुरावा म्हणून उपयोगी पडू शकते.

शेतकऱ्याने केंद्र शासनाच्या पोर्टलवर जाऊन शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज भरल्यानंतर हे अर्ज पुढे तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयातून संबंधित गावच्या तलाठ्याकडे तपासणीसाठी येतात. शेतकऱ्यांने भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री करण्याबरोबरच अर्ज बोगस नसल्याची पडताळणी देखील केली जाते. पुढे ही यादी तहसीलदार पातळीवरून अंतिम केली जाते. आणि पुढे हीच माहिती दिल्लीत केंद्र शासनाकडे पाठविली जाते. केंद्र सरकारला ही यादी प्राप्त झाल्यानंतर राज्यातल्या कोणत्याही यंत्रणेला मध्यस्थी न ठेवता सदर यादीनुसार थेट शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात दोन हजारांची रक्कम जमा होते.