Categories: कृषी

PM किसान योजनेचे ६००० रूपये मिळवण्यासाठी ३१ मार्च पूर्वी करा ‘हे’ काम अन्यथा पैसे मिळणे होईल बंद

नवीदिल्ली। देशातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारच्यावतीने सुरू करण्यात आलेल्यापंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कोट्यावधी शेतकऱ्यांना लाभ दिला जातोय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रूपयांची आर्थिक मदत केली जात असून हे पैसे शेतकऱ्यांना ३ हप्त्यात देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु या योजनेत काही बनावट खाती समाविष्ट करून शेतकऱ्यांच्या नावावर पैसे लाटण्याचे प्रकार समोर आलेत. त्यामुळे अशा बनावट खातेधारकांना आळा घालण्यासाठी आधारप्रमाणिकरण करून घेणे गरजेचे आहे.

ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एक किंवा दोन हप्ते मिळाले आहेत अशा शेतकऱ्यांनीही आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा ६ हजार रूपयांच्या रक्कमेवर पाणी सोडावे लागणार आहे. जे एक, दोन हप्ते देण्यात आले आहेत असे पैसे देखील खात्यातून परत घेतले जाणार आहेत. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपले बॅंक खाते आधारशी लिंक करणे गरजेचे आहे. सरकारचा हा निर्णय जम्मू-काश्मीर, लडाख, आसाम आणि मेघालयातील शेतकऱ्यांसाठी आहे, तर उर्वरित राज्यांमध्ये १ डिसेंबर २०१९ पासून आधार अनिवार्य करण्यात आले आहे.

कृषी मंत्रालयाच्या मते, जम्मू-काश्मीरमधील ७,९१,२४५ शेतकर्‍यांना योजनेच्या तीन हप्त्यांमधून पैसे मिळाले आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात ५,७५,२०२ शेतकऱ्यांनी २००० रुपयांचा पहिला हप्ता घेतला आहे. मेघालयात एकूण ३६,९५१ शेतकर्‍यांना तिसरा हप्ता मिळाला तर २४,६६५ शेतकर्‍यांना दुसऱ्या टप्प्यातील पहिला किंवा योजनेचा तिसरा हप्ता मिळाला. आसाममधील १९,९७,८४४ शेतकर्‍यांना २-२ हजार रुपयांचे तीनही हप्ते मिळाले आहेत, तर ९,५३,६०९ शेतकर्‍यांना दुसर्‍या टप्प्यातील पहिल्या हप्त्याचे पैसे प्राप्त झाले आहेत.

देशातील १४.५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तथापि यापैकी केवळ ६.४४ कोटी लोकांनाच २-२ हजारांचा तिसरा हप्ता मिळाला आहे. कागदपत्रांचा अभाव आणि आधार तपशील नसल्याने लोकांना पैसे मिळेनासे झाले आहे. त्यामुळे आधार लिंक करण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत दिलेल्या बँक खात्यावर आधार लिकं करा, अथवा बँक कर्मचार्‍यांना तुमच्या खात्यास आधार लिंक करण्यास सांगा.

Lokshahi News