PM Kisan - Lokshahi News
कोल्हापूर | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील अपात्र १३ हजार ६०९ शेतकर्यांना आता कारवाईचा सामना करावा लागणार आहे. या शेतकऱ्यांकडून तब्बल १३ कोटी ४० लाख ८२ हजार रुपयांची वसूली केली जाणार असून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार्या शेतकर्यांचे निकष यापूर्वीच केंद्र शासनाने जाहीर केले आहेत. यामध्ये आयकर भरणारे शेतकरी लाभ घेण्यास अपात्र ठरविण्यात आले आहेत. तरीही जिल्ह्यातील आयकर भरणार्या शेतकर्यांनी बोगसगिरी करण्याच्या उद्देशाने या योजनेसाठी अर्ज केले आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या यादीनुसार राज्याच्या पी.एम. किसान पथकप्रमुख तथा राज्याच्या कृषी उपायुक्तांनी अशा आयकर भरणार्या जिल्ह्यातील १३ हजार ४३७ शेतकर्यांची यादी जिल्हा प्रशासनाला पाठवली आहे. प्राप्त झालेल्या यादीनुसार आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत १३ कोटी २६ लाख ३२ हजार रूपये वितरित करण्यात आले आहेत. ही सर्व रक्कम आता वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
याबरोबरच या योजनेत मृत, दुबार लाभ, चुकीने मिळालेला लाभ अशा १७२ शेतकऱ्यांचीही यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. अशा अपात्र लोकांनाही गेल्या तीन वर्षांत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १४ लाख ५० हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. अशा एकूण १३ हजार ६०९ शेतकर्यांकडून १३ कोटी ४० लाख ८२ हजारांची वसूली प्रशासन करणार आहे. यासाठी तहसीलदारांना स्वतंत्र बँक खाते काढण्याची सूचना देण्यात आली असून वसूल झालेली रक्कम या खात्याद्वारे जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करावी लागणार आहे. त्यानंतर ही रक्कम कृषी आयुक्तालयाच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.