मुंबई | पंतप्रधान सन्मान निधी योजना देशभरातील शेतकरी वर्गात सर्वाधिक प्रसिध्द झालेली योजना आहे. परंतु सदर योजनेत काही राज्यांमध्ये घोटाळे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तामिळनाडू, उत्तरप्रदेश, ओडिसा राज्यांपाठोपाठ आता महाराष्ट्रात देखील पीएम किसान योजनेत घोटाळा झाल्याचे बोलेले जात असून अपात्र लोकांनी पीएम किसानचा लाभ घेतल्याचे सांगितले जात आहे.
एकाच कुटूंबातील एकापेक्षा अधिक व्यक्ती, आयकर भरणाऱ्या व्यक्ती, नावावर जमीन नसणाऱ्या व्यक्ती अशांचा या अपात्र यादीत समावेश आहे. ज्या व्यक्तीनी अपात्र असतानाही लाभ घेतला आहे अशा व्यक्तींकडून पैसे परत घेण्याची कारवाई सूरू झाली आहे. याबाबत ११ सप्टेंबर रोजीच कृषी आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तसेच नोडल ऑफिसरना याबाबत पत्राव्दारे कळवले आहे. यानुसार जिल्ह्यातील खातेदारांची पडताळणी करुन अपात्र व्यक्ती आढळल्यास लगेच कार्यवाही करुन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात राज्यातील ८.७८ लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. १ जून २०२० मध्ये राज्यात १०१.१५ लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली होती. तर १० सप्टेंबर २०२० पर्यंत १०९.९३ लाख लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती.
पीएम किसान योजनेत तामिळनाडू राज्यात ऑगस्ट २०२० मध्ये जवळपास ११० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले. तामिळनाडूतल्या कडलोर, कल्लाकुरूची, वेल्लोर, सालेम, त्रिची तसेच थिरूवरून जिल्ह्यात हजारो अपात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ देत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसै जमा केल्याचे उघडकीस आले होते.
या घोटाळ्यानंतर केंद्र सरकारने सगळ्याच राज्यांना पीएम किसान योजनेच्या खातेदारांची चौकशी करण्यास सांगितले आहे. यासाठी राज्यातल्या सगळ्या लाभार्थ्यांपैकी कोणत्याही (रँडम पध्दत) ५ टक्के गावांची तसेच लाभार्थ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही गावे आणि लाभार्थी कोण असतील याची यादीही केंद्र सरकारने प्रशासनाला दिली आहे. ही पडताळणी पुढील ६० दिवसात करून अपात्र व्यक्तींची खाती रद्द करण्यास सांगितले आहे.