Categories: कृषी बातम्या सामाजिक

स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकाशन

मुबंई | दिवंगत नेतेबाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. प्रकाशन सोहळ्याबाबतची माहिती स्वत: नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून थेट मराठी भाषेतून दिली होती. या सोहळ्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे देखील व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे उपस्थित होते. तर कार्यक्रमस्थळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षांच्या मान्यवरांनी हजेरी लावली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज १३ ऑक्टोबर रोजी व्हिडीओ कॉन्फरंसच्या माध्यमातून डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. यावेळी विखे पाटील यांच्या सन्मानार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर ‘लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’ असे करण्यात आले. 

गाव, गरीब, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात बाळासाहेबांचं योगदान आहे. येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्यांचे योगदान प्रेरणा देत राहील. वाजपेयींच्या काळात मंत्री असताना बाळासाहेबांनी देशातील अनेक भागात सहकार चळवळ वाढवली. त्यांनी सहकारासाठी दिलेलं योगदान वाखाणण्यासारखं आहे. असे मत यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. 

बाळासाहेबांनी साखर उद्योगाला प्रोत्साहन देण्याबरोबरच ग्रामीण भागात शिक्षण संस्था उभ्या करण्याचे काम केले. शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे, शेतीची उत्पादकता वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरताना जुन्या नव्याचा समन्वय साधणे, इथेनॉलचा वापर वाढवल्यास तेलासाठी बाहेर जाणारा पैसा वाचेल आणि शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळेल हे त्यांनी दाखवून दिल्याचे यावेळी मोदी यांनी सांगितले. 

यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, बाळासाहेबांची मूर्ती लहान पण किर्ती महान होती. अजूनही ते समोर आहेत असं जाणवतं. अडचणींचा सामना करत नाही तर जिद्दीने अडचणींवर मात करत पुढे येणारं विखे पाटील यांच घराणं आहे. व्यवस्थेचा दुष्काळ बाळासाहेबांनी दूर केलाच त्याचबरोबर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही त्यांनी सत्यात आणल्याचे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले. 

Team Lokshahi News