हरभरा हे महाराष्ट्रातील रबी हंगामात घेतले जाणारे प्रमुख डाळवर्गीय पिक आहे. राज्यात ह्या वर्षी 16.50 लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे. हरभरा पिकावर प्रामुख्याने घाटे अळी, मावा, व मुळे कुरतडणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. यापैकी घाटे अळी (Helicoverpa armigera Hubner) ही सर्वात जास्त नुकसान करणारी कीड म्हणून ओळखली जाते. एक अळी 30-40 घाट्यांचे नुकसान करते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरूक राहून या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करणे फार गरजेचे आहे.
घाटे अळी:
हि अळी हरभऱ्याप्रमाणेच कापूस, ज्वारी, मका, तूर, टमाटे आणि इतर कडधान्य पिकांवर आढळून येते. परंतु हरभरा हे तिचे आवडते खाद्य असल्याने तिला घाटे अळी म्हणून ओळखले जाते. या किडीचा जीवनकाळ अंडी, अळी, कोष व पतंग अशा चार अवस्थेतून पूर्ण होतो. अळी अवस्था पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. पतंग मजबूत बांध्याचे, फिक्कट पिवळ्या रंगाचे व पंखावर एक कला ठिपका असलेले असतो. मागील पंखाच्या कडा धुरकट असतात.
नर व मादी पतंगाच्या मिलनानंतर मादी पतंग 3 ते 4 दिवसात पिकाच्या पानाफुलावर अथवा कोवळ्या शेंड्यावर 150 ते 300 गोलाकार चकचकीत हिरवट पिवळसर रंगाची अंडी घालतात. अंड्यातून 6 ते 7 दिवसात भुरकट पांढऱ्या अळ्या बाहेर येतात. सुरुवातीच्या काळात अळ्या पानांच्या खालच्या बाजूस राहून पाने कुरतडून खातात. त्यामुळे पानांवर पांढरे डाग आढळून येतात. या काळातील नुकसान चटकन लक्षात येत नाही. कळ्या व फुले लागल्यानंतर अळ्या ते खातात. घाटे लागल्यानंतर अळी डोक्याकडील अर्धा भाग घाट्यात खुपसून आतील दाणे खाते. त्यामुळे घाट्यावर गोलाकार छिद्रे दिसुन येतात. अळीची पूर्ण वाढ 15 ते 20 दिवसात 5 ते 6 वेळा कात टाकून पूर्ण होते.
पूर्ण वाढलेली अळी 4 ते 5 सेमी लांब व गडद हिरव्या किंवा तपकिरी करड्या रंगाची असते आणि तिच्या शरीराच्या दोन्ही बाजूस करड्या अथवा पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. एक अळी पूर्ण वाढ अवस्थेत 30 ते 40 घाटे अथवा 6 ते 8 ग्रॅम दाणे खाते. अळीपासून पिकाचे साधारणत: 30 ते 40 टक्के नुकसान होते. कोषावस्थेत जाण्यापूर्वी अळीची 1 ते 2 दिवस भूक मंदावते व अळी झाडाच्या अवती भोवती जमिनीत 5 ते 10 सेमी खोल जाऊन अंगाभोवती मातीचे वेष्टण करून त्यामध्ये कोषावस्थेत जाते. कोष तांबड्या रंगाचे असून 1.5 ते 2 सेमी लांब असतात. हवामानानुसार कोषावस्था 8 ते 15 दिवसात पूर्ण होते. कोषातून परत रात्रीचे वेळी पतंग बाहेर पडतात आणि त्यांचे पुढील प्रजनन सुरु होते. अशाप्रकारे या किडीचा जीवनक्रम 30 ते 40 दिवसात पूर्ण होतो.
एकात्मिक कीड व्यवस्थापन:
हरभरा पिकाचे या किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे व त्या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.
वरील सर्व तंत्रांचा अवलंब करून सुद्धा शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास तसेच किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास शेवटचा पर्याय म्हणून खालीलपैकी एका कीटकनाशाकाची फवारणी करावी.
अ.क्र. | कीटकनाशक | मात्रा प्रति 10 लिटर |
1. | बी.टी.(कुर्स्तकी) | 15 ग्रॅम |
2. | बव्हेरिया बॅसियाना 1 टक्के डब्ल्यू पी | 60 ग्रॅम |
3. | क्लोरंट्रानिलीप्रोल 18.5 एस सी | 2.5 मिली |
4. | इमामेक्टीन बेन्झोएट 5 एस जी | 4.4 ग्रॅम |
5. | लॅमडा सायहेलोथ्रीन 5 ईसी | 12.5 मिली |
6. | क्विनॉलफॉस 25 ई सी | 20 मिली |
डॉ. कृष्णा अंभुरे, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण)८८३०७५०३९८डॉ. सुरेश कुलकर्णी
वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख
९८९०३८२१३०
कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी जि. नांदेड