Categories: बातम्या

कोल्हापुरातील राजकारण्यांनो तुम्हाला जरा तरी लाज वाटली पाहिजे..

कोल्हापूर | जिल्ह्यात गोकुळची निवडणुक आणि मतमोजणीची प्रक्रिया संपताच १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या निर्णयाने सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्या रागाचा पारा मात्र वाढला असून कोल्हापूरकरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून राजकारणी आणि प्रशासनावरील आपला रोष व्यक्त केला आहे.

सोशल मिडीयावर अनेक स्टेटस आणि पोस्ट या दरम्यान चांगलेच व्हायरल झाले आहेत. एक सामान्य कोल्हापूरकर… म्हणून लिहिलेली पोस्ट देखील चांगलीच व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहे.

वाचा सोशल मिडीयावरील ही व्हायरल पोस्ट
गेले महिनाभर कोरोनाचा प्रकोप चालू आहे. पण जिल्ह्यातील तमाम राजकीय नेते व त्यांचे कार्यकर्ते गोकूळ निवडणुकीचे राजकारण करण्यात मग्न होते. गोकूळच्या निवडणुकीत पैशाची खैरात चालू होती. या लोकांनी स्वतःचे आर्थिक व राजकीय हित साधण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेला वाऱ्यावर सोडले. या काळात रेमडेसीविर इंजेक्शन, कोरोना लस यांची उपलब्धता, शहर व जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची सोय असणारी तात्पुरती रुग्णालय यांची व्यवस्था याचा आढावा कोल्हापूरच्या एकाही राजकारण्याने केला नाही. आणि आज गोकुळची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत आल्यानंतर तात्काळ बैठक आयोजित करता व दिनांक 05/05/2021 पासून सकाळी 11.00 पासून 10 दिवसाचा कडकडीत लॉकडाऊन जाहीर करता या प्रकारास काय म्हणायचे? तुम्हाला जरा तरी लाज वाटली पाहिजे. तुम्हाला लस, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करता येत नाहीत आणि तुम्ही जनतेला गृहीत धरून मनमानी पद्धतीने निर्णय घेता?गोकूळचे लोणी खाण्यासाठी जेवढे घासला तेवढे लस मिळवण्यासाठी घासला असता तर कोल्हापूर जिल्हा लसीकरणात अव्वल ठरला असता. गेले 7 दिवस जिल्ह्यात लसीकरण कार्यक्रम बंद आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी प्रयत्न व जीवाचा आटापिटा करणाऱ्या तुमच्यासारख्या राजकीय नेत्यांना जनता वैतागली आहे. आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून रोजीरोटी मिळवण्याचा प्रयत्न करत होतो, ते पण तुम्ही सततचा लॉकडाऊन करुन मोडून पाडत आहात. तुमची घराणेशाही, सत्तेची हाव, पैश्याची भूक भस्म्या रोगासारखी वाढतच चालली आहे.
एक सामान्य कोल्हापूरकर…

Team Lokshahi News