कोल्हापूर: प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे ‘हे’ दुर्लक्ष जिल्हावासियांसाठी ठरतयं धोकादायक!

कोल्हापूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नदी प्रदूषणाची घटलेली पातळी प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा वाढू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया साखर कारखान्यातून निघणारे रसायनमिश्रीत सांडपाणी थेट नदी पात्रात मिसळत असून देखील प्रदूषण नियंत्रण महामंडळ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आलय. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे हे दुर्लक्ष आर्थिक तडजोडीतून होत असल्याची चर्चा कारखाना परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे. 

दत्त दालमिया खासगी तत्वावर चालवला जाणारा साखर कारखाना असून सन २०१४ सालापासून कारखान्यातून निघणारे रसायनमिश्रीत तसेच मळीयुक्त  सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. याबाबत कारखाना परिसरातील गावांमधील जागरूक नागरिकांनी वारंवार आवाज उठवून देखील मुर्दाड कारखाना प्रशासन आणि सरकारी यंत्रणा कोणतीच दाद देत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्यात कारखाना प्रशासन आणि जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांविरोधात संतापाची भावना आहे.

कारखाना परिसरातील शेतात रात्रीच्या दरम्यान रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने परिसरातील शेती नापीक होऊ लागल्याचा आरोपही इथल्या शेतकऱ्यांनी केला आहे. याबरोबरच अनेक नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे विकार, त्वचाविकार यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. याबाबत जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे परिसरातील नागरिकांनी तक्रारी देऊनही ठोस कारवाई केली जात नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. 

प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि कारखाना प्रशासनाकडून होत असलेल्या या दुर्लक्षाबाबत नागरिकांनी लोकशाही.न्यूज ला माहिती दिली असता आमच्या प्रतिनिधीने कासारी नदी पात्रापासून थेट दालमिया कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रित सांडपाण्याच्या ठिकाणापर्यंत माग काढला. कारखान्याच्या परिसरातून बाहेर पडणारे रसायनमिश्रित सांडपाणी आवळेकर ओढ्यावाटे थेट नदीपात्रात मिसळत असल्याचे यावेळी दिसून आले. तसेच कारखान्याच्या आतील परिसरातून देखील ज्या ठिकाणांवरून हे पाणी बाहेर सोडले जाते ती सर्व ठिकाणेही आमच्या प्रतिनिधीने चित्रित केली. आमच्या प्रतिनिधीच्या हाती लागलेल्या चित्रिकरणातून कारखाना प्रशासन आणि जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळ जिल्ह्यातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे उघड सत्य समोर आले आहे. यावेळी कारखाना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार देत उडवाउडवीची उत्तरे दिली.

यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्याशीही संपर्क साधला असता त्यांनी मार्च महिन्यातच कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे नमुने तपासले असल्याचे सांगितले. मात्र लाखो लिटर रसायनमिश्रीत सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत असून देखील याबाबत कारखाना प्रशासनाला साधी समज अथवा नोटीसही दिलेली नाही. त्यामुळे हे अधिकारी नेमके कुणाचे काम करतात असा प्रश्न यानिमित्ताने परिसरातील नागरिकांकडून विचारला जात आहे.

गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यातील नदी आणि वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या दत्त दालमिया कारखान्याबाबत जिल्हा प्रदुषण नियंत्रण महामंडळ कडक भूमिका घेत नसल्याचेच यावरून दिसून येत आहे. यामुळे केवळ नमुने तपासणीचे नाटक रंगवून जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करणाऱ्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवरच कडक कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हावासियांकडून केली जात आहे.