Categories: Featured

आयपीएल दुबईत आणि टशन मात्र राधानगरीत.. वा रं मर्दानू!

कोल्हापूर | यंदाचे आयपीएल सामने यूएईच्या मैदानावर होत असले तरी दरवर्षी प्रमाणे देशातल्या क्रिकेट रसिकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. आयपीएलच्या टीमचे चाहते आपापल्या टीमला चिअर अप करण्यासाठी व्हाट्सअॅप, फेसबुक स्टेट्स ठेवतात. या मैदानाबाहेरील क्रिकेटवेड्यांचा जोश इतका जबरदस्त असतो की सोशल मीडियाच्या पीचवर स्टेट्स पोस्टर वॉर खेळले जाते. 

मागील महिन्यात कोल्हापूर शिरोळ तालुक्यात याच प्रकारचे पोस्टर आणि स्टेट्स वॉर घडले. एकमेकांची टर्ररर उडवली गेली आणि यातून अशाच एका समर्थकाला ऊसाच्या फडात नेऊन चोपण्याचा प्रकार घडला. कुरुंदवाड येथे गाजलेल्या पोस्टर वॉर नंतर आता राधानगरीत आयपीएलच्या पार्श्वभूमीवरील पोस्टरने नव्या चर्चेला उधाण आले आहे. हे पोस्टर वॉर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग यांच्या समर्थकांतील आहे. राधानगरीच्या मार्केट चौकात मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी बॅनर्स झळकावल्यानंतर चेन्नई सुपरकिंगच्या चाहत्यांनीही त्याला उत्तर म्हणून त्या बॅनरशेजारीच चेन्नई सुपर किंगचे बॅनर झळकावले आहे. 

बॅनरमधून काय म्हणतात चाहते 
मुंबई इंडियन्सचे चाहते म्हणतात ‘जल मत बराबरी कर, नावातच दहशत’ तर त्याला उत्तर म्हणून चेन्नई सुपरकिंगचे समर्थक म्हणतात ‘धोनी साहेब’ 
यावर मुंबई इंडियन्स समर्थक पलटवार म्हणून ‘किंग ऑफ आयपीएल, आण्णा म्हणत्यात, सलाम ठोकत्यात’ असे उत्तर दिले आहे. यावर चेन्नई सुपरकिंगचे समर्थक म्हणतात ‘आण्णा गेले बंबात…कट्टर समर्थक’

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच समर्थकातील या वादाची आणि मारहाणीची दखल भारताचा एकेकाळचा कर्णधार विरेंद्र सेहवाग यानेही घेतली होती. त्याने ट्विटद्वारे असं करू नका अशी विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर आता राधानगरीतील ही नवीन पोस्टरबाजी मात्र चांगलीच चर्चेत आली आहे. 

Team Lokshahi News