Categories: Featured महिला

सांगली: गर्भवतीने ग्रहण काळात केले ‘हे’ धाडस; अंधश्रध्दांना दिली ‘अशी’ मूठमाती

सांगली | ग्रहण म्हणटलं की महिलांकडून अनेक गोष्टी पाळल्या जातात. यामध्ये काही शास्त्रीय तर काही अशास्त्रीय गोष्टींचा समावेश असतो. अशा वेळी बहुतांशी गोष्टी या अंधश्रध्देतूनच केल्या जातात. ग्रहणकाळात होत असलेल्या अशाच अंधश्रध्दांना मुठमाती देण्याचे धाडस सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात येथील एका गर्भवती महिलेने दाखवलाय. 

समृद्धी चंदन जाधव असं या महिलेचं नाव असून तिने पिढ्यान पिढ्या सुरु असलेल्या ग्रहणाच्या काळातील अंधश्रद्धांना मुठमाती देत ग्रहण काळात भाजी चिरणे, फळे कापणे, झाडांची फळं पानं तोडणं, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह अनेक शारीरिक हालचाली केल्या. तसेच प्रत्यक्ष सौर चष्म्यातून सूर्यग्रहण पाहून ग्रहणाचाही आनंद घेतलाय. ग्रहण काळात निषिद्ध ठरवल्या गेलेल्या अनेक दैनंदिन गोष्टी करुन समाजासमोर नवा दृष्टीकोन दिलाय. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही समृध्दी जाधव यांच्या या विशेष प्रयत्नांना पाठिंबा देत प्रोत्साहन दिलयं. अंनिसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समृद्धी जाधव म्हणाल्या, “आज आधुनिक काळात इंटरनेटच्या युगामध्ये अशा अंधश्रद्धा बाळगणे चुकीचे आहे. या उपक्रमात सहभागी झाल्याने मला खूप आनंद वाटला. विज्ञानाच्या काळात हे धाडसी पाऊल उचलायला नको का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माझे आणि माझ्या कुटुंबाचं प्रबोधन केलं. त्यानंतर आम्ही हे धाडसी पाऊल टाकलं. माझ्या कुटुंबीयांनीही मला यात साथ दिली. सासूबाई सिंधुताई जाधव, पती चंदन जाधव, दीपक जाधव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे यांनी प्रोत्साहन दिलं. 

इस्लामपुर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. सीमा पोरवाल याही यावेळी उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, “अंनिसच्या जनजागृतीचा कार्यक्रम पथदर्शी आहे. ग्रहणाच्या कालावधीत गर्भवती महिलेवर व गर्भावर कोणताही परिणाम होत नाही. बाळाची वाढ पहिल्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण झालेली असते. गर्भधारणेच्या काळात ग्रहण पाहिल्याने व कोणतीही शारीरिक कृती केल्याने बाळाला इजा होते ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. हे आजच्या उपक्रमातून पुढे येईल.”

अंधश्रद्धा निर्मुलनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे म्हणाले,”खगोलीय घटना अनुभवल्या पाहिजेत. याबाबत आम्ही नेहमीच कृती कार्यक्रम घेत असतो. सूर्यग्रहणाबाबत आजचा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडला. यासाठी समृद्धी जाधव या युवतीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.” 

एकूणच समाजातील महिलांनी अशा गोष्टींमध्ये पुढाकार घेतल्यास समाजातील अंधश्रध्दा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Superstition about Pregnant women amid Solar Eclipse