Categories: आरोग्य सामाजिक

कोल्हापूर शहरात १० दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर, महापालिका प्रशासनाचा निर्णय

कोल्हापूर | कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ध्यानात घेत अखेर कोल्हापूर शहरात १० दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. कोल्हापूर महापालिका प्रशासनाची यासंदर्भात महापालिकेत बैठक पार पडली. जोरदार विरोधानंतर अखेर जनता कर्फ्यूवर शिक्कामोर्तब करण्यात आले. ११ ते २१ सप्टेंबर या कालावधीत हा कर्फ्यू लागू करण्यात येणार असून जनतेने स्वतःहून सहभागी होण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

जनता कर्फ्यू ११ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२० दरम्यान पाळावा. कर्फ्यूसाठी कोणावर कोणतीही सक्ती नाही, प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर यांनी आज केले आहे.

दरम्यान, कोल्हापुरात अकरा ते सोळा सप्टेंबर या कालावधीत व्यापारी कर्फ्यु करण्याचा निर्णय आज (ता.८) कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय घेण्यापूर्वी रेडिमेड कापड व्यवसायिकांनी याला विरोध केला. त्यामुळे या बैठकीत हातवारे आणि आरे तुरेपर्यंत वाद गेला. अखेर कापड व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त करून काढता पाय घेतला. काहींनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला. मात्र चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी व्यापारी कर्फ्युचा निर्णय बैठकीत जाहीर केला. या कर्फ्युमध्ये औद्योगिक वसाहतीतील काम, अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा, औषध दुकान, दूध आणि बॅंका सुरूच राहणार आहे, तर भाजीपाला, किराणा, मसाले, इतर सर्व व्यवसाय बंद ठेवणार असल्याचे शेटे यांनी जाहीर केले. 

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. रोज किमान ७०० ते ८०० नव्या रूग्णांची भर पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजल्याचेच सिध्द झाले असून जिल्ह्यात समुह संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना, नागरिकांकडून ही योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुके आणि दोन नगरपालिका हद्दीत यापूर्वीच जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे.

Team Lokshahi News