पुणे।सध्या सोशलमिडीयाने कोण कधी आणि कशाप्रकारे फेमस होईल याचा काहीच नेम नाही. सोशल मिडीयावर सध्या एक आजी अशीच फेमस झाली असून त्यांचा अलिशान कार मधून भाजी विकतानाचा फोटो खूप व्हायरल झाला आहे. हिंजवडी आयटीपार्कसह सांगवी, पाषाण, औंध येथे अलिशान मोटारीतून या ७० वर्षीय आजी आपल्या मुलाच्या मदतीने भाजी विकतात.
शेतकरी कुटूंबातील या आजी मोटारीतून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात याचं सगळीकडे कौतुक होत आहे. सुमन निवृत्ती भरणे असं या आजीचं नाव आहे. तर त्यांच्या मुलाचे नाव संदीप निवृत्ती भरणे असं आहे. भरणे कुटुंबात एकूण १५ सदस्य आहेत. त्यांचं एकत्रित कुटुंब असून त्या सर्वांचा भाजी विक्रीवरच उदरनिर्वाह चालतो. तीन सुना आणि मुले शेतीमध्ये दिवस रात्र राबून भाजी पिकवतात आणि आजी बाजारात जाऊन ग्राहकांपर्यंत पोहचवतात.
भरणे कुटूंबियांची १५ एकर शेती असून विशेष म्हणजे या आजीबाई स्वतःशेतीत देखील राबतात. आपल्या शेतीत पिकलेला भाजीपाला या आजीबाई आपल्या मुलाच्या मदतीने पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, हिंजवडी या परिसरात लाखो रुपयांच्या इनोव्हा मोटारीतून आणून विकतात. सुमन भरणे या शेतकरी कुटुंबातील असून गेल्या ३० वर्षांपासून भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत.
सुमन आजी या पहाटे सकाळी उठवल्यानंतर घरातील काही कामं आवरतात. यानंतर घराच्या पाठीमागे असणाऱ्या शेतात जाऊन सुनांसह भाजी काढतात. त्यानंतर भाजी स्वच्छ धुवून घेतात. सायंकाळच्या सुमारास आलिशान इनोव्हामध्ये ही भाजी घेऊन आयटी हब असणाऱ्या हिंजवडी, पाषाण, औंध, सांगवी अशा ठिकाणी विकतात. त्यांच्या शेतात बटाटा, कांदा, पालक, मुळा, मेथी, कोथिंबीर अशा वेगवेगळ्या भाज्या पिकवल्या जातात.
सुरवातीला काही वर्ष त्या टेम्पोमधून भाजी विकत होत्या. मात्र, टेम्पो मोठा असल्याने रस्त्यावर पार्क करण्यासाठी जागा मोठी लागत होती. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी त्यांनी आलिशान मोटार विकत घेतली आणि मोटारीतच भाजी विकण्याचा व्यवसाय थाटला. यामुळे ग्राहकदेखील वाढले असल्याचं सुमन भरणे सांगतात. सध्या दररोज ५ ते १० हजारांचा भाजीपाला त्या सहज विकतात. शनिवार रविवार वगळता दररोज ५ ते ७ हजारांची भाजी विकली जाते , तर शनिवार रविवार १० ते १२ हजारांची भाजी विक्री होते.