Categories: सामाजिक

म्हणून महिला दिनी पुण्यातील पुरूषाचा ‘सर्वोत्कृष्ठ आई’ म्हणून सन्मान; जाणून घ्या काय आहे त्याची अभिमानास्पद कहाणी

पुणे। आज सगळीकडे आपण महिला दिन आनंदानं साजरा करत आहोत, पण या महिला दिनाला पुण्यातल्या एका पुरूषाला… हो पुरूषाला ‘सर्वोत्कृष्ट आई’ म्हणुन गौरवण्यात येणार आहे. नेमकं काय केल आहे या पुरूषाने हे जाणून घेतलं तर खरोखऱ तो या पुरस्कारासाठी खरोखरच किती पात्र आहे तुम्हालाही समजेल.

खरतरं मुलं दत्तक घेताना कोणताही पालक एका सुदृढ, आणि चांगल्या बाळाची निवड करतात, पण आदित्य तिवारीने चक्क डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाची निवड केली आहे. डाऊन सिंड्रोम हा मुलांमध्ये मतिमंदत्व आणणारा आजार असून हा आजार झालेल्या मुलांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना खूप जपावं लागतं. आदित्यने एकट्याने आपल्या बाळाची काळजी घेतली आहे. त्याच्या या कार्याबद्दल त्याला  आज महिला दिनी ‘जगातील सर्वोत्कृष्ट आई’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आदित्यने  ४ वर्षांपुर्वी म्हणजे २०१६ साली २२ महिन्याच्या अविनिशला दत्तक घेतलंय. यासाठी आदित्यने आपली इंजिनियरची नोकरी सोडली आणि डाऊन सिंड्रोम असलेल्या अविनिशची जबाबदारी उचलली. याबरोबरच त्याने ‘स्पेशल’ मुलांच्या आईवडिलांना मार्गदर्शन, समुपदेशन आणि त्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. यावेळी आदित्यच्या लक्षात आलं की भारतात बौद्धिक अपंगत्वसाठी वेगळा विभाग नाही. तसेच सरकारसुद्धा अशा मुलांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र देत नाही. म्हणून आदित्यने ऑनलाईन याचिका दाखल केली. परिणामी आज सरकारकडून स्पेशल मुलांसाठी वेगळा विभाग तयार करण्यात आला आहे आणि मुलांसाठी प्रमाणपत्रही देण्यात येत आहे.

आजपर्यंत आदित्य आणि अविनिश यांनी मिळून तब्बल २२ राज्यांची सफर  केली आहे. जवळजवळ ४०० ठिकाणी सभा आणि कार्यशाळा घेतल्या आहेत. याखेरीज ते जगभरातील १०,००० पालकांशी जोडले गेलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे संयुक्त राष्ट्राने आदित्यला या विषयावर झालेल्या परिषदेत भाग घेण्याचं निमंत्रण दिलं होतं.

आज महिला दिनाच्या निमित्ताने त्याला एका कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट आई म्हणून पुरस्कार दिला जाणार आहे. जितक्या सक्षमपणे आई आपल्या लेकराला सांभाळते , तितक्याच सक्षमपणे किशोर अविनिशची आई झाला आहे, त्याच्या या मातृत्वाचा आज होणारा गौरव म्हणजेच त्याच्या कार्याची खरी पोचपावती आहे.

Team Lokshahi News