Categories: Featured राजकीय

गिरीष बापट म्हणाले ‘नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पळाला’

पुणे।४ जानेवारी। नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पळाला, अशा शब्दात भाजप खासदार गिरीश बापट यांनी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. दरम्यान सत्तार यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात असलं, तरी शिवसेनेकडून त्याचा इन्कार करण्यात आला आहे.

बापट पुढे म्हणाले की, ‘मी अजून बातमी ऐकली किंवा वाचली नाही. ऐकीव बातम्यांवर मी प्रतिक्रिया देत नाही. तीन पायांच्या शर्यतीत अजून खूप मोठ्या घडामोडी घडणार आहेत. सरकार स्थापन होऊन काम सुरु व्हायच्या आधीच मंत्रिमंडळात किती अस्थितरता, चलबिचल आहे याची प्रचिती सत्तारांना आली’. ‘कोणाला काय काम दिलं, कोणतं खातं दिलं, हा आमचा विषय नाही. भविष्यकाळात काय वाढून ठेवलंय, कसं चालणार, याची छोटीशी चुणूक राजीनाम्यामुळे दिसली. पुण्यात ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलयं.

काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आमदार अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा होती, मात्र त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आल्याने ते नाराज होते. त्यातच औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर कमालीचे नाराज होते. या नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. परंतु सत्तार ज्या नेत्यांकडे राजीनामा दिला असं सांगत आहेत त्यांच्याकडे राजीनामा आलेला नसल्याचे शिवसेना नेते अनिल देसाई यांनी सांगितलं आहे.

Team Lokshahi News