Categories: बातम्या राजकीय

मेधा कुलकर्णी राष्ट्रवादीच्या वाटेवर? अजित पवारांच्या भेटीने चर्चांना उधाण

पुणे | भारतीय जनता पार्टीच्या नाराज असलेल्या नेत्यांपैकी माजी आमदार मेधा कुलकर्णी देखील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात चर्चेने जोर धरलाय. मेधा कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची पुण्यात भेट घेतल्याने या ही चर्चा सुरू झाली आहे. 

दरम्यान, माजी आमदार मेधा कुलकर्णी या आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. सध्यस्थितीत अनेक भाजप नेते हे इतर पक्षांच्या संपर्कात असल्याची चर्चा अनेकदा सुरू असते. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे तर याबाबतीत आघाडीवर असून भाजपने सध्या त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरवात केल्याचे बोलले जात आहे.

राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या उलटसुलट चर्चेनंतर अजित पवार यांची भेट घेतल्याची कबुली मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. मात्र अजित पवार यांची घेतलेली भेट ही राजकीय स्वरूपाची नसून, ती भेट नागरिकांची कामे घेऊन घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भेटी मुळे तर्कवितर्कांना जोर
मेधा कुलकर्णी यांच्यासह भारतीय जनता पार्टीतील अनेक नेत्यांनी आतापासूनच विधानपरिषदेसाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे विधान परिषदेची आमदारकी पदरी पाडून घेण्यासाठी कुलकर्णी यांना पक्षांतर्गत अडथळ्यांचा मोठा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे राजकीय कोंडी होऊ नये यासाठी मेधा कुलकर्णी यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. कुलकर्णी या भारतीय जनता पार्टीला राम राम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करतील आणि राष्ट्रवादीची उमेदवारी घेतील अशी अटकळ बांधली जात असली तरी या भेटीला राजकीय रंग देऊ नये, असं मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

Team Lokshahi News