Categories: आरोग्य सामाजिक

पुणेकरांनो.. घराबाहेर पडण्याआधी ऐका ‘हा’ फोन कॉल आणि ठरवा प्रशासन तुमची काळजी घेण्यास सक्षम आहे का?

पुणे | पुण्यातील कोरोना महामारीची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रशासन हतबल झाल्याचे सत्य दाखवून देणारी एक घटना उजेडात आलीय. पुणे येथील आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी हे वास्तव समोर आणलयं. मोरे यांनी श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रूग्णासाठी ऑक्सीजन सुविधा असलेल्या एका बेडची मागणी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे केली होती. यावेळी त्यांना मिळालेले उत्तर सर्वसामान्य पुणेकरांची झोप उडवणारं आहे.

हा फोन कॉल ऐका आणि पुणेकरांनो तुम्हीच ठरवा किती काळजी घेणं गरजेचे आहे.

डॉ. मोरे यांनी त्यांच्या मित्राच्या भावासाठी ऑक्सीजन बेड पुणे शहरात कोठे उपलब्ध आहे का याची चौकशी करण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला फोन केला होता. यावेळी त्यांना शहरात कुठेही बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. तसेच ज्यावेळी बेड उपलब्ध होईल त्यावेळी फोनकरून कळवले जाईल असे उत्तर देण्यात आले. मध्यंतरी बेड़ उपलब्ध न झाल्याने विश्रांतवाडीतील एका नागरिकाचा ससून मध्ये मृत्यु झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुरेशी आरोग्ययंत्रणा उपलब्ध असल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य यंत्रणेचा यामुळे बुरखा फाटला आहे. 

पुणे शहर, पिंपरी चिंचवड, आणि जिल्ह्यात सध्या कोरोनाचे ३५ हजार पेक्षा अधिक रूग्ण आहेत. आत्तापर्यंत १ हजार ७५ नागरिकांचा कोरोनाने मृत्यु झालाय. तर १ लाख ४२ हजार रूग्णांना उपचाराअंती घरी पाठवण्यात आले आहे. पुण्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकारने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याही करून पाहिल्या आहेत, भारतीय प्रशासकीय सेवेतील तब्बल २० अधिकारी पुण्यात कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी तळ ठोकून आहेत. तरीही ४० लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात सक्षम आरोग्य यंत्रणा उभारणे महापालिकेला शक्य झालेले नाही. 

Team Lokshahi News