मुंबई।२८ डिसेंबर। विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि विद्यमान भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’च्या वृत्ताने राजकीय वर्तुळात चर्चाना जोर आलाय. पुत्रप्रेमापोटी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राधाकृष्ण विखे – पाटील यांनी कॉंग्रेसला राम राम करत भाजपात उडी मारली होती.
आता राज्यात भाजपाची सत्ता गेल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी घरवापसीसाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. भाजपामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या पुत्राने पाडापाडीचे राजकारण केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे. त्यामुळे भाजपामध्ये त्यांना विरोध वाढला असल्याचे उघड झाले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनादरम्यानच विखे पाटील यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड चर्चा केल्याचे वृत्त आहे. एका दैनिकानं याबाबत बातमी दिली आहे. त्यानंतर विखे पाटील घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं.
फडणवीस सरकारच्या काळात भाजपवासी झालेल्या विखेंना तीन महिने मंत्रिपद अनुभवण्याची संधी मिळाली होती. पुन्हा फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप सरकार स्थापन होईल, असा गाढ विश्वास असल्यामुळे विखे पुन्हा मंत्रिपद मिळण्याच्या धुंदीत होते. परंतु आता, भाजपची सत्ता गेल्यावर सत्ताधारी झालेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश करण्याच्या हालचाली विखेंनी सुरु केल्याचं बोललं जातं. दरम्यान, मला कोणीही भेटलेलं नाही. माझी कुणाशी चर्चा झाली नसल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केलं आहे.