राहुल गांधींना धक्काबुक्की, हाथरसकडे पायी जाताना पोलिसांनी अडवलं

लखनऊ | हाथरसला पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. यासोबतच काँग्रेस कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी लाठीमार केला असून यावेळी राहुल गांधीही जमिनीवर पडलेत. पोलिसांच्या विरोधानंतरही हाथरसला जाऊन पीडितेच्या कुटुंबांची भेट घेण्याचा निश्चय राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांचा ताफा अडवल्याने त्यांनी यमुना एक्स्प्रेस हायवेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला. यादरम्यानही एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी “ये देखो आज का हिंदुस्तान,” असं म्हणत असताना त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली. त्यावेळी राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. त्यानंतर ते उठून पुन्हा चालू लागले.

हाथरस प्रकरणावरून सोनिया गांधी यांनी टीका केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी हाथरसकडे रवाना झाले होते. दरम्यान त्यांना रोखून उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याने कॉंग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.