Categories: गुन्हे

धक्कादायक: आता कोल्हापूरात महिलांचाही जुगार अड्डा; पोलिसांच्या छाप्यात सहा महिला ताब्यात..!

कोल्हापूर | जुगार अड्डा म्हणटलं की आजपर्यंत पुरूष हेच समीकरण बहुतांशी लोकांना माहित होतं. परंतु याला छेद देणारी घटना कोल्हापूरात उघडकीस आली असून चक्क महिलांचा जुगार अड्डा पोलिसांना सापडला आहे. टेंबलाईवाडी परिसरात चालणाऱ्या या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी अड्डा मालक महिला, दोन युवक यांच्यासह ८ जणांना अटक केली आहे. महिलांकडून चालवल्या जाणाऱ्या या अड्डयावर छापा पडताच परिसरात खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणी अड्डा मालक शोभा संजय हेगडे (रा. झेंडा चौक, कागल), निलम विजय कांबळे (रा. मणेर मळा, उचगांव), वर्षा इकबाल लोंढे (वय ३०), दिपाली आकाश लोंढे (वय २०, दोघीही रा. टाकाळा झोपडपट्टी), भिंगरी अविनाश सकट (वय ४०, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी), सुरेखा राजू नरंदेकर (वय ३७, टेंबलाई नाका), करीम मोहिद्दीन खान (वय ३८, रा. ओमसाई पार्क, उचगांव)  सुनील संभाजी घोडके (वय ३८, रा. घोडके चाळ, टेंबलाई नाका), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

टेंबलाई नाका परिसरातील झोपडपट्टीत महिलांचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नवनाथ घुगरे यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी रोख सहा हजार रूपये, दोन मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण १४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापुर्वी दारू अड्डे, मटका अड्डे चालवणाऱ्या महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. पण महिलांच्या जुगार अड्ड्यावरील छाप्याची ही पहिलीच कारवाई असून ती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. 

Team Lokshahi News