Categories: राजकीय

सदाभाऊ खोत यांना समिती नेमून हाकलून लावलंय – राजू शेट्टी

कोल्हापूर | ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहे, अशा लोकांसोबतच मी काम करतो, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केलीय. तसेच ज्यांना समिती नेमून पक्षातून हाकलून लावले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच येत नाही असे म्हणत सदाभाऊ खोत यांची पुन्हा दिलजमाई करण्याची ऑफर धुडकावून लावलीय. 

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यासोबत दिलजमाईचे संकेत दिले होते. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आमची विचारधारा एकच आहे. केवळ काही मुद्द्यांवर आमचे मतभेद होते. तसेच ज्या प्रस्थापितांविरोधात आम्ही रस्त्यावरची लढाई लढलो त्यांच्याच सोबत राजू शेट्टी यांनी हातमिळवणी केल्याने आमच्यात मतभेद झाल्याचे खोत म्हणाले होते. आमच्यातले वाद केवळ शेतकऱ्यांच्या काही मुद्द्यांवर होते. आमच्यात काही बांधावरचं भांडण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच दोघांचीही भूमिका आहे, असही खोत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे पहिल्यांदाच खोत आणि शेट्टी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

परंतु सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यानंतर राजू शेट्टी यांनी तीव्र भाषेत प्रतिक्रिया देत, आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा प्रयत्न सुरू आहे. ज्या ठिकाणी आहेत, तिथे काही तरी पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला. खोत यांना शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल तर त्यांनी ‘कडकनाथ’चे पैसे परत करावेत, असं आव्हानही दिलं. शेट्टी यांनी दिलेल्या या तीव्र प्रतिक्रियेमुळे शेट्टी-खोत यांच्यातील दिलजमाईचे दरवाजे बंद झाल्याचं बोलले जात आहे. 

सदाभाऊंच्या वक्तव्यानंतर दोन्ही संघटनांमधील कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. मात्र, शेट्टी यांनी खोत यांना संघटनेचे दरवाजे बंद राहतील असे सांगून दिलजमाईला स्पष्ट नकार दिला. यावर सदाभाऊ खोत काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सदाभाऊंनी देखील तितकीच तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. 

राजू शेट्टी आता दररोज गोमूत्राने आंघोळ करतात का? – सदाभाऊ खोतांचा सवाल
राजू शेट्टींनी २५ वर्षे माझ्या हातात हात घालून काम केले. माझे हात स्वच्छ नव्हते तर २५ वर्षे सोबत काम करताना कसं चालतं होतं? मी चारित्र्यहीन आहे तर शेट्टी आता काय दररोज गोमूत्राने आंघोळ करतात का? असा प्रश्नही खोत यांनी उपस्थित केलाय. सदाभाऊ खोत आणि रयत क्रांती संघटनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आम्हाला राजू शेट्टी यांच्या नावाची गरज नसल्याचेही खोत यांनी स्पष्ट केले आहे. 

भाजप वरील नाराजीतून सदाभाऊंची वेगळी चूल –
सध्या भाजप आणि सदाभाऊ खोत यांच्यात दरी वाढत चालली आहे. पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून ही बाब प्रकर्षाने समोर आलीय. रयत क्रांती संघटनेने  पुणे पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी वेगळी चूल मांडलीय. भाजपकडून कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सदाभाऊ खोत आणि रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांना सामावून घेतले जात नसल्याने खोत भाजपवर नाराज आहेत. यासंदर्भात सदाभाऊ खोत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या लवकरच बैठक होणार आहे. 

Team Lokshahi News