Categories: कृषी

शेतकऱ्यांच्या पोरानी हातात दगड घेतल्यावर तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत – राजू शेट्टी

कोल्हापूर | शेतकऱ्यांचा हमीभावाचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर करोडो शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील. त्यानंतर मात्र आमच्या हातातील दगडांमुळे तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत, असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. केंद्र सरकारने रविवारी राज्यसभेत कृषी क्षेत्राबद्दलची विधेयके मंजूर करुन घेतली. त्यावरुन राजू शेट्टी यांनी सरकारवर ही टीका केली आहे.

पाशवी बहुमताच्या जोरावर भलेही तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेत कायदे पास कराल पण त्याची अंमलबजावणी कशी करता हे पाहायचे आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने राजकीय पक्षांच्या मदतीने शेतीला कॉर्पोरेटच्या घशात घातले आणि शेतकऱ्यांना शेतीतून बाहेर काढायचा प्रयत्न केला आहे. मात्र, हमीभाव हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, हे सरकारने याद राखावे, असा इशारा शेट्टी यांनी केंद्र सरकारला दिला.

नरेंद्र मोदी सरकारच्या कृषी विषयक विधेयकांवरुन केंद्रीय मंत्री हरसीमरत कौर यांनी राजीनामा दिला होता. हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिला होता. पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांमध्ये या विधेयकांवरून मोठा असंतोष निर्माण झाला आहे. तृणमूल, आप आणि काँग्रेस खासदारांच्या विरोधानंतरही गोंधळाच्या वातावरणात राज्यसभेत कृषीविषयक दोन विधेयकं मंजूर करण्यात आली. ही विधेयकं आवाजी मतदानाने संमत झाली. यामध्ये कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, तसेच हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक याचा समावेश आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: PM Modi