Categories: Featured राजकीय

…आणि राजू शेट्टींनी आमदारकीवर पाणी सोडले?

कोल्हापूर | राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन १२ आमदारांची निवड करण्यात येणार आहे. त्यापैकी राष्ट्रवादीच्या कोट्यातून १ जागेवर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आला होता. परवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार हे जवळपास निश्चित झाले, मात्र गेल्या दोन दिवसात राजू शेट्टी यांच्या जवळच्या व स्वाभिमानीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी शेट्टींच्या आमदारकी स्वीकारण्याला तीव्र विरोध करत रान पेटवले. परिणामी राजू शेट्टी यांनी दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असे मत व्यक्त केले.

राजू शेट्टी यांनी काहीवेळापूर्वी फेसबुक पोस्ट केली असून त्यात त्यांनी हे मत व्यक्त केलय.
काय म्हणाले राजू शेट्टी फेसबुक पोस्ट मध्ये – स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आम्ही चळवळीतून उभी केली आहे असा दावा करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकर मादनाईक, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जालंधर पाटील यांच्या सहित जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी राजू शेट्टी स्वतः संघटनेच्या विचारांशी फारकत घेत आहेत यांसह अनेक आरोप केले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर “कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मिडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये. मन जुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते” असे मत पोष्ट्द्वारे फेसबुकवर व्यक्त केले आहे.

Team Lokshahi News